नवी दिल्ली, 3 मे 2023
अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी, दूरदृष्टीने संरचनात्मक बदल घडत आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्लीत आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाच्या स्थितीचा आढावा घेतला , यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार उपस्थित होत्या.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” कार्यक्रमाच्या 99 व्या भागात देशवासियांना अवयवदानाच्या उदात्त हेतूसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते.
यामुळे देशात अवयवदानाला नवे प्रोत्साहन मिळाले आहे. देशातील एकूण अवयव प्रत्यारोपणाची संख्या 2013 मधील 5000 वरून वाढून 2022 मध्ये 15000 पेक्षा अधिक झाली आहे. आता, राष्ट्रीय (राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था.), प्रादेशिक ( प्रादेशिक अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था) आणि राज्य स्तरावरील (राज्य अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था) अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थांच्या जाळ्याच्या माध्यमातून चांगल्या समन्वयामुळे एका मृत दात्याच्या अधिकाधिक अवयवांचा वापर केला जात आहे उदा. सन 2016 मध्ये 930 मृत दात्यांच्या 2265 अवयवांचा वापर करण्यात आला तर 2022 मध्ये 904 मृत दात्यांच्या 2765 अवयवांचा वापर करता आला.
रूग्णालयांमध्ये अवयव दान आणि प्रत्यारोपण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शक म्हणून प्रत्यारोपण नियमपुस्तिका बनवण्यासाठी राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था, काम करत आहे आणि प्रत्यारोपण समन्वयकांच्या प्रशिक्षणासाठी मानक अभ्यासक्रमावर देखील काम करत आहे. दस्तऐवजांची पूर्तता करून लवकरच या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध केल्या जातील. कार्यक्रमाच्या योग्य अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेमध्ये समन्वय,माहिती, शिक्षण आणि संप्रेषण, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ /लेखा यासाठी चार स्तंभ तयार केले आहेत. अलीकडेच, भारत सरकारने सार्वजनिक हितासाठी विशेष कल्याणकारी उपाय म्हणून, दुसर्या मनुष्याला अवयव दान करणार्या केंद्रीय सरकारी कर्मचार्यांना 42 दिवसांपर्यंतची विशेष नैमित्तिक रजा रजा मंजूर केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय देशातील अवयव दान आणि प्रत्यारोपणाच्या संख्येत वाढ करण्यासाठीच्या आगामी संरचनात्मक सुधारणांसाठी आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतीं आत्मसात करत आहे.