गुरुग्राम, ०३ मे २०२३: भारतातील अग्रगण्य एअरलाइन्सपैकी एक आणि स्टार अलायन्स सदस्य एअर इंडियाने पूर्ण-सेवा कॅरियर विस्तारा (टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा संयुक्त उपक्रम) सोबत इंटरलाइन भागीदारी केली आहे.
या भागीदारीमुळे एअर इंडियाच्या प्रवाशांना विस्ताराच्या रूट नेटवर्कवर एअर इंडियाच्या विस्तृत देशांतर्गत आणि जागतिक नेटवर्कमध्ये ८० पेक्षा जास्त ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येणे शक्य आहे.
दोन एअरलाइन्समधील कराराच्या व्याप्तीमध्ये इंटर एअरलाइन थ्रू चेक-इन (आयएटीसीआय) अंमलबजावणीचा समावेश आहे. त्यामुळे अतिथींना एकाच तिकिटावर सर्व प्रवासी क्षेत्रांसाठी प्रस्थानाच्या पहिल्या टप्प्यावर त्यांचे बोर्डिंग पास मिळू शकतात आणि त्यांच्या प्रवासाच्या अंतिम स्थानापर्यंत त्यांच्या सामानाची तपासणी करता येते. एअर इंडिया आणि विस्तारा भारतातील बहुतांश प्रमुख विमानतळांवर एकाच टर्मिनलवर काम करतात. त्यामुळे इंटरलाइन प्रवास कार्यक्रमांसह पाहुण्यांसाठी प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव सुलभ होतो.
एअर इंडिया आणि विस्ताराने ‘इंटरलाइन कन्सिडरेशन्स ऑन इररेग्युलर ऑपरेशन्स (IROPS)’ किंवा ‘डिसरप्शन हस्तांतरण’ कार्यक्षमता देखील लागू केली आहे. यामुळे विमानाला उशीर होणे, रद्द होणे, दुसरीकडे वळवणे इ. यांसारख्या कार्यात्मक व्यत्ययांच्या बाबतीत दोन्ही विमानकंपन्या प्रवाशांना एकमेकांच्या पहिल्या उपलब्ध पर्यायी फ्लाइटमध्ये विनाअडथळा प्रवेश देऊ शकतात आणि त्यांच्या पाहुण्यांची होणारी गैरसोय कमी करू शकतात.
एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले: “आम्ही विस्तारासोबतच्या आमच्या इंटरलाइन भागीदारीबद्दल खूश आहोत. यामुळे आमच्या विस्तारित मार्ग नेटवर्कवर भारतात आणि भारता बाहेर प्रवास करणाऱ्या आमच्या संयुक्त ग्राहकांना अधिक कनेक्टिव्हिटी आणि सुविधा मिळेल. सुरक्षितता आणि ग्राहक सेवेतील उत्कृष्टता याबद्दल आमची समान वचनबद्धता या भागीदारीमध्ये अग्रस्थानी आहे. आम्ही विस्ताराच्या ग्राहकांना अमेरिका, युरोप, अति पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि मध्य पूर्वमधील एअर इंडियाच्या गंतव्यस्थानांवर अतिरिक्त प्रवास पर्यायांसह सेवा देण्यासाठी उत्सुक आहोत.”
विस्ताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कन्नन म्हणाले, “ही भागीदारी भारतातील दोन आघाडीच्या विमानकंपन्यांना आमच्या संयुक्त नेटवर्कवर प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक सुविधा आणि वर्धित कनेक्टिव्हिटी देण्यासाठी एकत्र आणते. जगभर उड्डाण करण्याचा सर्वात चांगला आणि सर्वाधिक सोयीस्कर मार्ग आमच्या ग्राहकांना सादर करण्याच्या आमच्या खोलवर रुजलेल्या बांधिलकीचे हे प्रतिबिंब आहे. एअर इंडियासोबतचे आमचे संबंध अधिक दृढ करताना आणि आमच्या ग्राहकांना त्यांच्या विस्तृत नेटवर्कमध्ये नवीन स्थळांशी जोडताना आम्हाला आनंद होत आहे.”
विस्तारासोबत एअर इंडियाची इंटरलाइन भागीदारी १०० हून अधिक इंटरलाइन करार आणि ५० च्या जवळपास चेक-इन करार यात घातलेली भर आहे. त्यात लुफ्थांसा, युनायटेड एअरलाइन्स, एअर कॅनडा आणि सिंगापूर एअरलाइन्स यांसारख्या जागतिक स्तरावर भागीदार विमानकंपन्या आहेत.
अलिकडेच, एअर इंडियाने ‘विहान.एआय’ (एअर इंडियाची ५ वर्षीय परिवर्तन योजना) मध्ये ‘टेक ऑफ’ टप्प्यात प्रवेश केल्याची घोषणा केली असून उत्कृष्टतेच्या दिशेने बांधणी करण्यासाठी आवश्यक प्लॅटफॉर्म, प्रक्रिया आणि प्रणाली विकसित करण्यावर केंद्रित आहे.