पुणे- पिंपरी- चिंचवड शहरात अवकाळी मुसळधार पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे रावेत भागात होर्डिंग कोसळून ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून यात ८ जण अडकले होते. पैकी ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती रावेत पोलिसांनी दिली आहे.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दुचाकीचालक भिजल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
रावेत भागातील मुकाई चौकात वाहतूक पोलिसांच्या चौकीच्या पाठीमागे झाडपडीची घटना घडली असून दुचाकी देखील वादळी वाऱ्यामुळे पडल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी फ्लेक्स देखील फाटले असून मुकाई चौकात वाहतूक कोंडी झाली होती. काही मिनिटं पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचले होते.
किवळे येथील अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेतीलमृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आणलेले आहेत. निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही, आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली .
किवळेतील होर्डिंगवाला, जागा मालक, संबंधित जबाबदार अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वाधाचा गुन्हा दाखल होत नाही. व एफआयआरची कॉपी आम्हाला मिळत नाही. तसेच मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासन व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने २५ लाख रुपयांची मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेऊन धरणे आंदोलन सुरू आहे.
आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर , विनोद भंडारी , धनाजी येळकर पाटील , गणेश सकटे , दत्ता देवतरासे , मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आदि सहभागी झाले आहेत.