हे माझे वैयक्तिक मत -भाजपच्या सवालावर दिले स्पष्टीकरण
मुंबई -‘घाबरलेले लोभी लोक आज स्वतःच्या फायद्यासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान करत आहेत. देशाच्या जनतेची लढाई राहुल गांधी एकटेच लढत आहेत. भांडवलदार चोरांशी व चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदारांशीही’, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शरद पवार व उद्योगपती गौतम अदानी यांचा एक फोटोही शेअर केला आहे.
अलका यांच्या या विधानानंतर भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी त्यांना हे काँग्रेसचे अधिकृत निवेदन आहे का? अशी विचारणा केली. ते म्हणाले – अलका लांबा यांनी शरद पवार यांच्यावर अविश्वसनीय हल्ला केला. त्या त्यांना लोभी व घाबरट म्हणाल्या. एक महाराष्ट्रीयन असल्याच्या नात्याने मी या घटनेमुळे थक्क झालो आहे.
अलका लांबा यांनी भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या प्रश्नाला स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या – शरद पवारांविषयी त्यांचे विधान काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही. अधिकृत भूमिका पक्षाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जारी केली जाते. अलका म्हणाल्या – ‘मी एक काँग्रेस कायकर्ती आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांची जबाबदारीही माझी आहे. पक्षात लोकशाही आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.’
यापूर्वी अलका लांबा यांनी अजित पवार यांच्यावर टीका करणारे ट्वीट केले होते . ज्यात अजित पवारांची मजबुरी समजून घ्या असे म्हटले होते आणि हे ट्वीट आज पुन्हा रीट्वीट केले आहे . ज्यात जेल जानेसे बचना है तो .. तानाशाह के सामने झुकना है … असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान जून २०२२ मध्ये पीएम मोदी यांचे मित्र म्हणून गणले जाणारे गौतम अदानी हे सहकुटुंब बारामतीत पवार कुटुंबाच्या भेटीस गेले होते या वेळेचे फोटो देखील आता पुन्हा उजेडात आणले जात आहेत . त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः गाडी चालवत अदानींच सारथ्य केलं. जे अदानी एरवी देशातील विरोधी पक्षांच्या टीकेच्या केंद्रस्थानी असतात त्याच अदानींनी विरोधी पक्ष ज्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहतात त्या पवारांच्या घरी पाहुणचार घेतला होता .