माजी नगरसेवक नाना भानगिरे यांचा पुढाकार
पुणे-हडपसर येथील चिंतामणी नगरची आगीत दुरवस्था झालेल्या भाजी मंडईच्या सुधारणेसाठी महापालिका सुमारे ८४ लाख रुपये खर्च करणार आहे . आगीत इथल्या गाळेधारकांचे खूप नुकसान झाले होते. तेव्हापासून भाजी मंडई बंद आहे. मात्र आता लवकरच मंडई पूर्ववत होणार आहे. त्यासाठीची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
दि.२१/२/२०२३ रोजी हडपसर येथील ओटा मार्केटला शॉर्टसर्किटमुळे आग लागून मार्केटचे व व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . 90 दुकाने यामध्ये जळाली होती. अजूनही हे मार्कट बंद आहे. त्याभागातील नागरिकांचे गैरसोय होत असल्याने तेथीलमाजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी उपरोक्त ठिकाणी भेट देऊन ओटा मार्केटचे कामकाज प्रशासनामार्फत त्वरित करणेबाबत सुचविले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.या कामासाठी 84 लाख 30 हजाराचा खर्च अपेक्षित आहे. सुरुवातीला हे काम महानगरपालिका अधिनियमातील कलम ६७ (३)(क)नुसार करून घेण्याबाबत वित्तीय समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी हे काम शॉर्ट टेंडर प्रक्रिया करून घेण्याचे आदेश खात्याला दिले. दरम्यान मार्च एन्ड ला हे काम खात्याकडून होऊ शकले नाही. तसेच नवीन बजेट मध्ये यासाठी खात्याला निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे भवन रचना विभागाकडील निधीचे लॉकिंग करून लवकरच टेंडर प्रक्रिया सुरु करणार असल्याचे माधव जगताप यांनी सांगितले. यामुळे येथील गाळेधारक आणि नागरिकाना दिलासा मिळणार आहे.