पुणे : काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून अज्ञाताने ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आठवड्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृहनेते,नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकावून २० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तत्पूर्वी माजी महापौर मोहोळ यांचा मोबाईल हॅॅक करून त्यांच्या नावाने त्यांच्याच परिचिताला ३ करोड ची खंडणी मागण्यात आली होती .राजकीय नेत्यांंना धमकावून खंडणी मागण्याच्या घटना एकापाठोपाठ घडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मोहोळ यांच्या प्रकरणात दोघांना अटक झाली असली तरी मास्टर माइंड शोधण्यात अद्यापही यश आल्याचे दिसत नाही तर बागवे आणि बिडकर यांना खंडणी मागणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. बागवे यांचा भवानी पेठेतील कासेवाडी परिसरातून निवडून आले होते. कसबा विधानसभा निवडणुकीत बागवे यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे. ते माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे सुपुत्र आहेत .अभ्यासू आणि आक्रमक नगरसेवक अशी ओळख असलेले अविनाश बागवे महापालिकेतील अनेक घोटाळे, नियमबाह्य कामे बाहेर काढण्यात ते वाकबगार आहेत
अविनाश रमेश बागवे (रा. पद्मजी पार्क, भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बागवे यांच्या मोबाइलवर अज्ञाताने दूरध्वनी (व्हाॅटसॲप काॅल) केला. त्यांना धमकावून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास निवडणुकीला उभे राहू देणार नाही. गोळ्या घालून जीवे मारु तसेच राजकीय कारकीर्द संपवून टाकू, अशी धमकी अज्ञाताने बागवे यांना दिली. बागवे यांनी पोलिसांकडून तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर तपास करत आहेत.