महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह
ॲड.आस्वाद पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवड करण्या संदर्भात आज राज्य संघटनेच्या कार्यकारणीची सभा संघटनेचे अध्यक्ष तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या सभेत संघटनेच्या कार्यकारणीने सर्वानुमते सरकार्यवाहपदी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची निवड केली,ही निवड राज्य संघटनेचा कालावधी संपेपर्यंत असणार आहे.
बाबुराव चांदेरे यांनी स्वर्गवासीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या समवेत कामकाज केल्यामुळे त्यांना या संघटनेच्या कामकाजाविषयी अनुभव आहे त्या अनुभवाचा निश्चितपणे फायदा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला होईल आता देखील राज्य संघटनेच्या कार्यकारणीचे सभासद म्हणून उत्कृष्ट पणे कामकाज पाहिले आहे त्याचप्रमाणे बाबुराव चांदेरे यांनी आजतागायत कबड्डी क्षेत्रात दिलेले योगदान व गेली ३५ ते ४० वर्षाचा असलेला प्रदीर्घ अनुभव पाहता चांदेरे यांच्यावर राज्य कबड्डी संघटनेच्या सरकार्यवाह पदाची जबाबदारी देणे संघटनेच्या हितावह ठरणार असल्याने संघटनेच्या कार्यकारणीने चांदेरे यांची एक मताने निवड केली असल्याचे राज्य संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितले.
बाबुराव चांदेरे यांची निवड करताना राज्य संघटनेचे सहकार्यवाह – मदन गायकवाड यांनी सुचक तर उपाध्यक्ष तथा आमदार – भाई जगताप यांनी अनुमोदक म्हणून सुचविले.
याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष व खासदार – सुनील तटकरे, उपाध्यक्ष – अमरसिंह पंडित, आमदार – भाई जगताप, उपाध्यक्षा – शकुंतला खटावकर, कोषाध्यक्ष – मंगल पांडे, सहकार्यवाह – रविंद्र देसाई , मदन गायकवाड , महादेव साठे, मनोज पाटील, सय्यद मुज्जफर, लिना कांबळे व इतर सभासद उपस्थित होते .