जव्हार/पालघर:”राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही कायम सुरू राहणार असून, याचे पैसे कधीच बंद होणार नाहीत. महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करणे हेच शासनाचे मुख्य ध्येय आहे. जमिनीशी स्त्रीचे नाते जुने असून, बचत गटांच्या माध्यमातून महिला अधिक आत्मनिर्भर होतील,” अशी ग्वाही शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या मा.उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
मौजे रायतळे (आदर्शगाव) येथे आयोजित ‘आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना’ अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांना निधी व मदत साहित्य वितरण कार्यक्रमात त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. आपल्या भाषणात त्यांनी जव्हार-मोखाडा परिसरातील त्यांच्या जुन्या सामाजिक कामाच्या आठवणींना उजाळा देत, पूर्वीच्या तुलनेत आजच्या आदिवासी महिला अधिक सक्षम व सजग झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.या कार्यक्रमाला विक्रमगड विधानसभेचे स्थानिक आमदार श्री. हरिश्चंद्र भोये, शिवसेना सचिव तथा पालघर जिल्हा संपर्कप्रमुख श्री. पांडुरंग पाटील, संयोजक श्री.अमित गीते, तसेच कृषी अधिकारी श्री. जयराम आठर, श्री. रवींद्र गिरमे, श्रीमती अरुणाताई चौधरी आणि जव्हार परिसरातील अनेक महिला कार्यकर्त्या, पुरस्कार प्राप्त व्यक्ती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला बचत गटांसाठी मोठी घोषणा
महिलांसाठी एक मोठी घोषणा करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, महसूल विभागाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार महिला बचत गटांना सामूहिक शेती किंवा वृक्षारोपणासाठी अडीच हेक्टरपर्यंत सरकारी जमीन वापरण्यासाठी मिळू शकणार आहे, ज्याचा महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.
अंधश्रद्धा निर्मूलन आणि महिलांचे आरोग्य
गावागावांत अजूनही आढळणाऱ्या अंधश्रद्धा, अंगात येणे किंवा भगताकडे जाणे या प्रकारांवर बोलताना त्या म्हणाल्या की, अनेकदा महिलांवर असलेल्या मानसिक दबावामुळे किंवा आरोग्याच्या तक्रारींमुळे असे प्रकार घडतात. महिलांमधील रक्तक्षय (ॲनिमिया) आणि कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी सरकारने मोफत गोळ्यांची सोय केली आहे. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी, यासाठी लवकरच विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. तसेच सुशिक्षित महिलांना पोलिसांसोबत समन्वय ठेवून काम करण्याची संधी दिली जाईल. महिलांनी २० जणींचे गट तयार करून दर सोमवारी शासकीय कार्यालयांमध्ये ‘लोकशाही दिना’च्या माध्यमातून आपल्या हक्कांचा पाठपुरावा करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
शासकीय योजनांमुळे कुटुंबांमध्ये कौटुंबिक सलोखा
यावेळी बोलताना मान्यवरांनी स्पष्ट केले की, ‘लाडकी बहीण योजने’तून मिळणारी १५०० रुपये ही रक्कम सर्वसामान्य महिलांसाठी साधारण नसून, यामुळे महिलांना घरगुती वस्तू खरेदी करण्यासोबतच स्वतःच्या आरोग्यासाठीही हातभार लागत आहे. याशिवाय, महिलांना एसटी प्रवासात ५०% सवलत आणि वृद्धांना मोफत प्रवास दिल्यामुळे अनेक कुटुंबे तीर्थक्षेत्री जात असून, समाज व कुटुंबांमध्ये एक चांगला कौटुंबिक सलोखा साधला जात आहे. सरकारच्या विविध आरोग्यदायी योजनांमुळे स्त्रियांचे व पर्यायाने संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य राखले जात आहे. ‘सरकार आपल्या दारी’ या योजनेद्वारे अनेक अंगणवाडी प्रकल्पांना सरकारी प्रोत्साहन, आर्थिक मदत आणि पुरस्कार दिले जात आहेत.
महिला दक्षता समिती आणि सुरक्षा
महिलांच्या सुरक्षेसाठी ‘महिला दक्षता समिती’ची स्थापना करण्यात आली असून, याद्वारे महिलांना आपल्या विभागातील समस्या थेट मांडता येणार आहेत. या समस्यांची दखल थेट पोलीस महासंचालकांकडून घेतली जाईल. या संदर्भात नुकतीच डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
*”चालू अधिवेशनातून वेळ काढून पालघरच्या विकासासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू.”
— आ.डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना नेत्या, मा.उपसभापती, विधानपरिषद)

