श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन ; पालखी व नवीन बगाड उद्घाटन
पुणे : श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांचा उत्सव गुरुवार, दिनांक ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. उत्सवांतर्गत लघुरुद्र, अष्टोत्तरी नामावली, आरती, पालखी व नवीन बगाड उद््घाटन, महापूजा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता पालखी व नवीन बगाड उद््घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार यांच्या हस्ते उद््घाटन होणार आहे. त्यापूर्वी सकाळी ६.३० वाजता लघुरुद्र व आरती, दुपारी १२ वाजता अष्टोत्तरी नामावली व माध्यान्ह आरती होणार आहे.
रात्री ९ वाजता मुख्य बगाड सोहळा होणार असून त्यानंतर रात्री ९.३० वाजता महापूजा व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. त्यातीलच एक मुख्य उत्सव असलेला हा उत्सव अनेक वर्षे साजरा केला जातो.
कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित उत्सवाला व बगाडाकरिता भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.