- पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून बापट यांना श्रद्धांजली अर्पण,
- पत्रकारांनी दिला बापट यांच्यासमवेतच्या आठवणीना उजाळा
पुणे, ता. 4 एप्रिल :
सर्वसामान्य नागरिकांसाठी गिरीश बापट यांनी कायम संघर्षाची भूमिका घेतली. पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी भांडतानाच पत्रकार हल्ला विरोधी कायदा व्हावा, यासाठी बापट आग्रही राहिले, पत्रकारांना आपल्या जवळचे मित्र हरपल्याची भावना मनात कायम राहील, अशा शब्दात त्यांच्या बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून दिवंगत खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, सरचिटणीस पांडुरंग सरोदे उपस्थिती होते.
ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई म्हणाले, “बापट हे पत्रकारांचे अतिशय जवळचे मित्र होते. पत्रकारांच्या अनेक प्रश्नात लक्ष घालून ते सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. पत्रकारांसमवेतचा त्यांचा जिव्हाळा होता. ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करीत त्यानी सामाजिक दृष्टिकोन त्यांनी कायम ठेवला.”
विनायक कुलकर्णी म्हणाले, “नवखा पत्रकार असतानाही त्याला जवळचा मानून प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा सुरुवातीपासूनच प्रवास आम्ही अनुभवला.”
विठ्ठल जाधव म्हणाले, “पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासाठी बापट कायम आग्रही होते. ते प्रचंड अभ्यासू होते, विधिमंडळाच्या ग्रंथालयाचा सर्वाधिक वापर त्यांनी केली. माणसे जोडणारा राजकीय नेता अशी त्यांची खास ओळख होती. विधिमंडळाच्या सर्व आयुधांचा वापर त्यांच्याकडून केला जात होता.”
शैलेश काळे म्हणाले ” जुन्या, नव्या पत्रकारांसोबत त्यांनी कायम आपली नाळ जोडली होती. ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्याबरोबरच ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शनचा मुद्दा त्यांनी सरकार दरबारी मांडला. राज्याच्या मंत्रिमंडळात हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.”
राजेंद्र तु. पाटील म्हणाले, “बापट यांनी विचारांशी कधीही तडजोड केली नाही. पत्रकारांचे, पत्रकार संघाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ते कायम आग्रही होते. अनेक महत्वाच्या प्रश्नावर ते वेळप्रसंगी आक्रमक होऊन तो प्रश्न पोटतिडकिने मांडत होते.”
स्वप्नील बापट म्हणाले, “खासदार बापट यांचा पत्रकारांसमवेतचा जिव्हाळा कायम होता. अधिवेशन संपल्यानंतर विधिमंडळ कामकाजाचा आढावा ते पत्रकारांसोबत घेत असत. अनेक बातम्यांचे विषय त्यातून पुढे येत. बापट यांनी पुणे श्रमिक पत्रकार
संघामधील उपक्रमांमध्ये सहभाग घेतला तसेच संघासाठी महत्वाचे योगदान दिले.”