पुणे : काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचे गुरुवारी दुपारी३ वाजता ह्रदयविकाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांना पंधरा दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठे बंधू राजू तसेच अन्य परिवार आहे. स्वतः शरद रणपिसे अविवाहीत होते.पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी म्हणून पुण्यातील बहुतांश पदाधिकारी मुंबईत आहेत. शहराध्यक्ष रमेश.बागवे, माजी आमदार मोहन जोशी,आबा बागुल ,अँड अभय छाजेड हे सर्वजण मुंबईत असताना आज त्यांचे निधन झाले . त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच अविनाश बागवे, अजित दरेकर, हेमंत बागुल,रमेश अय्यर आदींनी जोशी हॉस्पिटलकडे धाव घेतली .आणि त्यांच्या निधनाचे वृत्त समजले
बॅॅरीस्टर गाडगीळ,प्रकाश ढेरे, सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वा समवेत काम करत १९७९ साली ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर १९८५ ते १९९५ पर्यंत पर्वती विधानसभा मतदार संघातून ते दोन वेळा आमदार झाले व तीन वेळा विधानपरिषदेचे सदस्य होते. सध्या ते काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते होते. अतीशय मनमिळावू आणि अभ्यासू नेते म्हणून रणपिसे सर्व पक्षात परिचित होते. काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ते ओळखले जात. पुण्यात काँग्रेसची राजकीय स्थिती अवघड होत असतानाही पक्षाच्या जून्या कार्यकर्त्यांची एक फळी त्यांनी नेटाने टिकवून ठेवली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत त्यांनी विविध पदावर तीन दशके काम केले. आपल्याला दिलेली जबाबदारी अतिशय चोखपणे त्यांनी पार पाडली.
प्रतिभा पाटील यांच्याबरोबर रणपिसे यांचा स्नेह
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याबरोबर रणपिसे यांचा स्नेह होता. पुण्यातच स्थायिक असलेल्या पाटील यांंनी बुधवारी दुपारी रूग्णालयात येऊन रणपिसे यांची भेट घेतली. शरद माझा धाकटा भाऊ आहे त्याला लवकर बरे करा असे डॉक्टरांंना सांगत पाटील यांनी रूग्णालयात अर्धातास रणपिसे यांच्यासमवेत व्यतीत केला असे नगरसेवक अविनाश साळवे यांनी सांगितले.
शिवरकर -रणपिसे यांची जोडी ख्यातनाम
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर व रणपिसे यांची महाविद्यालयीन वयापासून घनिष्ट मैत्री होती. दोघेही काँग्रेसचे काम करत. त्यांना पदेही मिळाली. फुले आंबेडकर अशीच त्यांची ओळख काँग्रेसमध्ये त्या काळात होती. अतिशय जवळचा मित्र मी गमावला, हे दु:ख शब्दात व्यक्त करणे अवघड आहे अशी भावना शिवरकर यांनी व्यक्त केली. उद्या 11 वाजता कोरेगावपार्क स्मशान भूमी येथे,शरद रणपिसे त्यांच्या पार्थिवा वर अंत्यसंस्कार होणार आहेत.