पुणे :“ विश्वात शांतता हवी असेल तर भेदाभेदा बंद होणे गरजेचे आहे. हीच शिकवण कबीरांनी आपल्या दोह्यांमध्ये सांगितली आहे. त्यांनी मानवतेनुसार हिंदू मुस्लिमतेचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. कबीर यांच्या विचारांमध्ये जाती, पंथ, देशच नाही, तर संपूर्ण विश्वाचा विचार केला गेला आहे.,”असे प्रतिपादन लोकसभेचे माजी सभापती व माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.
डॉ विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे व आचार्य आर. के. सोनग्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. रतनलाल सोनग्रा अनुवादित ‘कबीरवाणी’ या ग्रंथाचे प्रकाशन शिवराज पाटील यांच्या हस्ते एमआयटीत झाले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, श्री. शैलेश पाटील, कबीरवाणी ग्रंथाचे अनुवादक प्रा. रतनलाल सोनग्रा, डॉ. सुधीर गव्हाणे व आरती सोनग्रा हे उपस्थित होते.
शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले,“ज्ञान व प्रेम कितीही दिले तर ते शिल्लकच उरते, ही शिकवण कबीरांनी दिली. त्यांच्या रचनेमधूनही हीच शिकवण मिळते. भाषा, प्रांत, धर्म, देश, इतकेच नव्हे, तर मानव व प्राणी यांचाही अडथळा नसणारे व जीवनमूल्यांचे विचार कबीरांनी आपल्या तत्त्वज्ञानामध्ये मांडले आहेत. संतांची शिकवण ही मानव उत्थानासाठी आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, गुरूनानक, एवढेच नव्हें, तर येशूख्रिस्त यांनी सत्याचे विवरण केले. गुरू ग्रंथ साहिबामध्ये कबीर,नामदेव व सुफी यांचे दोहे आहेत.”
वर्तमान स्थिति वर भाष्य करतांना शिवराज पाटील म्हणाले, युरोपमध्ये छोट्या-छोट्या देशांची वाटणी झाली त्यामुळे सर्वात अधिक युद्धे तेथेच झाली. जेथे वाटणी कराल तेथे संकुचित व्हाल. त्यामुळेच सर्वांना बरोबरच घेऊन चला. म्हणजे मोठे व्हाल.
सरदार जाफरी यांच्या ग्रंथाचे कबीरवाणी या नावने अनुवाद करणारे प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले,“ कबीर यांनी आपल्या दोह्यांमधून जीवनाला एका सूत्रात बांधले आहे. त्यांनी समाजातील विसंगतीवर बोट ठेऊन जीवन सुखमय बनण्याचे सूत्र सांगितले. कबीरांनी लिहिलेल्या दोह्यांवर सर्व जगभर मोठ्या प्रमाणात अध्ययन सुरू आहे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ कबीरवाणीचा प्रत्येक सिद्धांत जीवनात सुख-शांती कशी मिळेल हे दाखवितो. भारतीय संस्कृती ही मानवता दर्शविणारी आहे. ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्या प्रमाणेच सर्व भारतभर जे महान संत होऊन गेले, त्यामध्ये संत कबीरांचे स्थान फार वरचे आहे. कबीराचा संदेश हा 21व्या शतकात भारतातून विश्वाला सुख, समाधान व शांतीचा मार्ग दाखवील.”
मधुकर भावे म्हणाले,“ बुद्ध, कबीर आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्ती या जगात सुद्धा नाहीत. कबीर याला संत असे संबोधून आपण त्यांना दूर लोटतो. कबीर हा सामान्यांचा तत्वज्ञानी आहे.”
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,“ भाषा, वेष, संगीत, कला इ. बाबतीत श्रमिकांना अधुनमधूनच संधी मिळते. अशी संधी कबीराच्या रूपाने मिळाली. कबीरपंथीयांनी ही परंपरा चालू ठेवली आहे .”े
प्रा. सुधीर गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रीती जोशी व समृद्धी पाठक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी आभार मानले.
कबीरांच्या विचारांमध्ये वैश्विक दृष्टीकोनाचा समावेश-शिवराज पाटील
Date: