पुणे : विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा बंधुताभूषण पुरस्कार यंदा अभिनेत्री मृणाल वानखेडे व शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजुरके यांना जाहीर झाला आहे. बंधुता लोकचळवळीचा सुवर्णमहोत्सव व बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त २ जून २०२४ रोजी नवी पेठेतील पत्रकार भवनामध्ये होणाऱ्या पहिल्या विश्वबंधुता काव्यमहोत्सवात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती काव्यमहोत्सवाचे मुख्य संयोजक डॉ. बंडोपंत कांबळे यांनी दिली.
मृणाल वानखेडे यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा संस्थेतून अभ्यासक्रम पूर्ण करत सिनेसृष्टीमध्ये निर्माती-अभिनेत्री म्हणून नुकतेच पदार्पण केले आहे. मृणाल यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘वल्ली’ चित्रपटाची सिंगापूर, बंगळुरू आणि पुणे फेस्टिवलसाठी निवड झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कान्स फेस्टिवलमध्येही त्याचे स्क्रीनिंग झाले आहे. श्रद्धा झिंजुरके यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाचे शिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली आहे.
ज्येष्ठ गजलकार मीना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या काव्यमहोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी, साहित्यिक प्रा. शंकर आथरे यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्ष मधुश्री ओव्हाळ, जेष्ठ गजलकार सिराज शिकलगार, रानकवी नामदेव जाधव, प्रिया माळी, संगीता झिंजुरके यांच्यासह नामवंत कवी महोत्सवात सहभागी होतील. मान्यवर कवींना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे, असे महोत्सवाचे निमंत्रक प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी सांगितले.