पुणे : महाराष्ट्राच्या मालविका बनसोड आणि कौशल धर्मामेर यांनी पुणे जिल्हा अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना आयोजित वरिष्ठ गटाच्या व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
शिवाजीनगर येथील मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित मालविकाने गुजरातच्या बिगरमानांकित अदिता रावला १३-२१, २१-१७, २२-२० असे पराभूत केले आणि विजेतेपद पटकावले. ही लढत एक तास आणि तीन मिनिटे चालली.
मालविकाला या स्पर्धेत सुरुवातीपासूनच जेतेपदासाठी फेव्हरिट मानले जात होते. नुकत्याच गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिला महिला एकेरीचे उपविजेतेपद मिळाले होते. गुजरातच्या अदिती रावने पात्रता फेरीतील तीन लढती जिंकून मुख्य फेरी गाठली होती. मुख्य फेरीतही तिने मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे अंतिम लढतीत चुरस अपेक्षित होती. अदिती रावने पहिल्या गेममध्ये जबरदस्त सुरुवात केली. स्मॅशचा अचूक वापर आणि नेटजवळ सुरेख खेळ करून तिने पहिली गेम जिंकली. मालविकाला सुर गवसायला वेळ लागला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये मालविकाने दमदार पुनरागमन केले. तिने फटक्यांमध्ये अचूकता राखली. निर्णायक क्षणी मालविकाने आपला खेळ उंचावून दुसरी गेम जिंकून बरोबरी साधली. तिसरी गेम अतिशय चुरशीची झाली. दोघींमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस बघायला मिळाली. दोघीही सहजासहजी गुण बहाल करीत नव्हत्या. मात्र, २०-२० अशा बरोबरीनंतर मालविकाने सलग दोन गुण घेऊन गेमसह लढत जिंकली. विजयानंतर मालविका म्हणाली, की या स्पर्धेतील विजेतेपदाचा विश्वास होता. मात्र, मी कुठेही गाफील राहिले नाही. प्रतिस्पर्ध्याचा विचार न करता स्वत:च्या जमेच्या बाजूंवर विश्वास राखून खेळले. अदितीने चांगली लढत दिली. मी तिच्याविरुद्ध पहिल्यांदाच खेळत होते. वरिष्ठ गटाचे जेतेपद नेहमीच आनंददायी असते. या स्पर्धेत खेळण्याचा आनंदच वेगळा असतो.
मालविका व्ही. व्ही. नातू स्मृती स्पर्धेत दुसऱयांदा खेळत होती. याआधी ती २०१९ मध्ये सहभागी झाली होती. त्या वेळी तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मालविकाचे हे वरिष्ठ गटाचे चौथे विजेतेपद आहे.
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत कौशलने महाराष्ट्राच्याच रोहन गुरबानीला २१-१०, २१-१६ असे नमविले. ही लढत ३६ मिनिटे चालली. दोन्ही गेममध्ये कौशलने रोहनला फारशी संधीच दिली नाही. पहिली गेम एकतर्फीच झाली. दुसऱ्या गेममध्ये रोहनने आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कौशलने त्याला ही संधी मिळू दिली नाही. विजयानंतर मुंबईचा कौशल म्हणाला, की माझ्यासाठी हे विजेतेपद खास आहे. या स्पर्धेतून मला खूप काही शिकायला मिळाले.
खुशी गुप्ताला दुहेरी मुकुट
दिल्लीच्या खुशी गुप्ताने दुहेरी मुकुट मिळवला. तिने महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. मिश्र दुहेरीत खुशीने तेलंगणच्या सिद्धार्थ एलान्गोसह खेळताना अरविंद सुरेश -पवित्रा नवीन या केरळच्या जोडीवर २१-१९, २१-१५ अशी मात करून जेतेपद पटकावले. यानंतर महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत खुशीने मणिपूरच्या प्रिया देवीसह खेळताना शिखा गौतम (कर्नाटक) -पूर्विशा एस. राम (आरबीआय) जोडीचा २१-१७, १७-२१, २१-१२ असा पराभव करून जेतेपद निश्चित केले. पुरुष दुहेरीत अग्रमानांकित तामिळनाडूच्या हरिहरन अमसकरुनन-रुबनकुनार आर. जोडीने महाराष्ट्राच्या विप्लव कुवळे-विराज कुवळे जोडीवर २१-१८, २१-१६ अशी मात करून विजेतेपद पटकावले.
विजेत्यांना क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, लोकमान्य मल्टीपर्पजचे सुशील जाधव, पीएनजी सन्सचे अमित मोडक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, सचिव रणजित नातू, आयोजन समिती सचिव राजीव बाग, अविनाश जाधव, सारंग लागू, डॉ. संजय पुरंदरे उपस्थित होते. विजेत्यांना एकूण पाच लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली. यात एकेरीतील विजेत्यांना ४८,७०० रुपये आणि करंडक, उपविजेत्यांना २४,८०० रुपये देऊन गौरविण्यात आले. दुहेरीतील विजेत्यांना ५१,३०० आणि उपविजेत्यांना २४,८०० रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.