पुणे, दि. २ नोव्हेंबर, २०२२ :- महावितरण पुणे प्रादेशिक विभागांतर्गत विद्युत सहाय्यक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. गुरुवारी (दि. ३) सकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभागस्तरीय रोजगार मेळाव्यात या नियुक्तीपत्रांचे वाटप होणार आहे.
या विभागस्तरीय रोजगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तांत्रिक शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील असणार आहेत. तर कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व खासदार गिरीश बापट हे उपस्थित राहणार आहेत. सोबतच विधानसभा व विधान परिषद सदस्य सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
कागदपत्रे पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गातील उमेदवारांना महावितरणचे नियुक्तीपत्र पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे प्रादेशिक विभागांतर्गत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आपले नियुक्तीपत्र घेण्यासाठी सकाळी ९ वाजता बहुउद्देशीय हॉल (पाचवा मजला) जिल्हाधिकारी कार्यालय येथे हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दि. २९, ३० व ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी महावितरणच्या पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात आल्यानंतर विद्युत सहाय्यक या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
पुणे प्रादेशिक विभागांतर्गत एकूण ३१४ विद्युत सहाय्यकांची निवड करण्यात आलेली आहे. पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. पात्र ठरलेल्या विद्युत सहाय्यकांपैकी १०८ उमेदवारांना पुणे जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात ४८ उमेदवारांना, ५४ उमेदवारांना सोलापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात ५४ उमेदवारांना व कोल्हापूर जिल्ह्यातील ५० उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.