लायन्स क्लब ऑफ शिवाजीनगर च्या वतीने ५० बालकांसोबत दिवाळी उत्सव
पुणे : दिवाळीतील सुंदर सजावट…आवडीची गाणी लावल्यानंतर गाण्यांच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटणारी मुले..जादूचे कार्यक्रम आणि विविध खेळ खेळत केक कापण्याचा आनंद केमोथेरपी घेत असलेल्या कॅन्सरग्रस्त मुलांनी लुटला. दिवाळी उत्सवाचा आनंद या चिमुकल्यांना देखील मिळावा यासाठी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
लायन्स क्लब पूना शिवाजीनगर यांच्या वतीने भारती हाॅस्पीटल व संशोधन केंद्र पुणे येथे ५० बाल कर्करूग्णांसाठी दिवाळी सेलिब्रेशन विथ डिफरन्स उपक्रमांतर्गत दिवाळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख पाहुणे नरेंद्र भंडारी, क्लबचे अध्यक्ष जीवन हेंद्रे, प्रकल्प समन्वयक विजया बांगड आणि विजय जाजू, त्यांचे मार्गदर्शक डॉ. ज्योती तोष्णीवाल उपस्थित होते. भारती हाॅस्पीटलच्या उपवैद्यकीय संचालक डॉ. अरुंधती पवार आणि कर्करोग-विशेषज्ञ डॉ. विभा बाफना यांचे सहकार्य उपक्रमाला मिळाले. कॅन्सरग्रस्त मुले आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न लायन्स क्लब पूना शिवाजीनगरच्या सदस्यांच्यावतीने करण्यात आला.
डॉ. अनिल तोष्णीवाल यांच्या उपस्थितीत अध्यक्ष जीवन हेंद्रे आणि इतरांना आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. संजीव भोसले आणि नीलिमा भोसले यांनी हा उपक्रम प्रायोजित केला होता.
नरेंद्र भंडारी म्हणाले, केमोथेरपी उपचार घेत असलेली ही मुले खूप नाजूक आहेत. त्यांना एकत्र आणणे खूप कठीण आहे. भारती हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या प्रचंड सहकार्याने आमच्या लायन्स क्लब शिवाजीनगरने मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी केलेला हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे.