प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज

Date:

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्यावतीने ‘वारकरी  संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी 72 व्या प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासोबत सहभागी होणाऱ्या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत असून चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे.

महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि 15 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 32 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी नम्पीबौ मरिनमई यांनी आज कँटॉन्मेंट परिसरातील राष्ट्रीय रंगशाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.प्रजासत्ताक दिनी दरवर्षी राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर आणि विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या वारकरी संतांची थोर परंपरा दर्शविणारा चित्ररथ सादर करण्याचा निर्णय झाला आणि विभागाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत सुंदर व सुबक चित्ररथ तयार केल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक ‍बिभीषण चवरे यांनी  परिचय केंद्राशी  बोलताना सांगितले.

वारकरी संत व समकालीन संतांनी जाती व्यवस्था, विषमता आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवत समाज प्रबोधनाचे महान कार्य केले आहे. हीच संतपरंपरा दर्शविणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 8 फुट उंचीची आसनस्थ मूर्ती खास आकर्षण आहे. संत ज्ञानेश्वरांच्या मूर्ती समोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस झालेले संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारीत ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे प्रत्येकी 8 फूट उंचीचे फिरते पुतळे आहेत. या चित्ररथावरील राज्यातील वारकरी संतांचे व भक्तांचे दैवत असणाऱ्या पांडुरंगाची कटेवर हात असणारी 8.5 फुट उंचीची लोभस मूर्ती भक्तीभावाचे मुर्तीमंत रुप घेवून अवतरली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फुट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत.

चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या मूर्ती  उभारण्यात आल्या आहेत.

या कलाकारांनी उभारला चित्ररथ

राज्याच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती नागपूर येथील टीम शुभचे रोशन इंगोले (केळझर, वर्धा)  आणि तुषार प्रधान (यवतमाळ) या कलाकारांनी तयार केले आहेत. कला दिग्दर्शक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 30 कारागिरांनी अतिशय आकर्षक चित्ररथ उभारला आहे.

तांत्रिक कौशल्यही विशेष

या चित्ररथावर एकूण चार फिरत्या मुर्त्या साकारण्यात आल्या असून त्यासाठी यवतमाळ येथील राजेश टेंभरे आणि अंकुश टेंभरे या पिता-पुत्रांनी तंत्रज्ञ म्हणून चोख भूमिका वठवली आहे. टाकाऊ वस्तुंचा वापर करून या पिता-पुत्रांनी चित्ररथावरील शिवाजी महाराज व तुकाराम महाराजांच्या भेटीची मूर्ती, पांडुरंगाच्या कटीवर हात असलेली मूर्ती, संत जनाबाई आणि संत चोखामेळा यांच्या फिरत्या मुर्त्या उत्तमरित्या कार्यान्वित केल्या आहेत.

चित्ररथावर चार कलाकार देणार प्रस्तुती

वारकऱ्यांच्या वेशात मृदंग, टाळ आणि विणाधारी चार कलाकार चित्ररथावर प्रस्तुती देणार आहेत. याशिवाय चित्ररथाच्या उजव्या व डाव्या बाजुला प्रत्येकी चार कलाकार वारकऱ्यांच्या भूमिका साकारणार आहेत. ठाणे येथील कलांकुर ग्रुपचे 12 कलाकार या भूमिका साकारणार आहेत.

विठुचा गजर…‘ गीत आणि वारकऱ्यांचा नामघोष असणार आकर्षण

राजपथावरील प्रमुख पाहुण्यांसमोर चित्ररथ येताच येथे होणाऱ्या सादरीकरणात विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविलाहे विठ्ठलाचा महिमा सांगणारे गीत ऐकायला मिळणार आहे. यासोबत ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग-पांडुरंग हे वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध नामघोषऐकविण्यात येणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...