रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे श्याम खामकर यांना भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदान
पुणे : आत्मसंवाद होतो तेव्हा काव्य निर्माण होते. शब्दांशी खेळणे म्हणजे गझल नाही. अस्वस्थ मनावर मात करण्यासाठी कविता, गझल उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माझी अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. चिंतनशील आणि प्रामाणिक लेखक-कवींना व्यक्त होण्यसाठी भौगोलिक बंधने आड येत नाहीत. त्याने व्यक्त होणे आवश्यक असते, असेही त्यांनी सूचित केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध कवी, गझलकार श्याम खामकर (खडकवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांचा भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्काराने आज (दि. 29) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण भारत सासणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सिने-नाट्य अभिनेत्री, कवयित्री भाग्यश्री देसाई यांची विशेष उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होत्या.
साहित्यिकाचा स्वसंवाद महत्त्वाचा असतो असे सांगून भारत सासणे पुढे म्हणाले, आपले काव्य किती लोकांपर्यंत पोहाचते आहे, किती लोक ऐकत आहेत याचा भयगंड बाळगू नये.
कलाकार हे सुंदरतेचे प्रवासी असतात असे सांगून भाग्यश्री देसाई म्हणाल्या, उपजीविकेनंतर जीविकेमागे लागणे महत्त्वाचे असते. जीविका करणारे फार कमी असतात. लोकांना आनंद देत सुंदरतेच्या वाटेवरून नेणे हे कलाकाराचे काम असते.
साहित्य संमेलनाच्या मंचावर गझलकारांना संधी का मिळू शकत नाही असा प्रश्न श्याम खामकर यांनी या वेळी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, गझल या प्रकाराकडे निखळपणे पाहणारे फार कमी आहेत. या काव्य प्रकाराला दुय्यम स्थान दिले जाते. अभ्यासक्रमामध्येही फारच कमी गझलकारांना स्थान मिळत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याची ओळख करून दिली. मान्यवरांचा परिचय तनुजा चव्हाण, मानपत्राचे वाचन पल्लवी पाठक तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित गझल मुशायरा कार्यक्रमात प्रमोद खराडे, नचिकेत जोशी, डॉ. मंदार खरे, सुनिती लिमये, नूतन शेटे, कविता क्षीरसागर, चंचल काळे, डॉ. मृणालिनी गायकवाड, स्वाती यादव, उर्मिला वाणी, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार, प्रभा सोनवणे, स्वप्नील पोरे यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन कांचन सावंत यांनी केले.