भीमा कोरेगावचे युद्ध जरी पेशवा विरुद्ध इंग्रज असे झाले असले तरी इंग्रजांनी महार सैनिकांच्या बळावर हे युद्ध पुकारले होते. महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रजांच्या सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे साम्राज्य भारतात पसरवण्यासाठी नव्हे तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते, असे काही इतिहासकार म्हणतात. भीमा कोरेगावच्या या लढाईत ‘महार रेजिमेंट’ने इंग्रजांना विजय मिळवून दिला होता. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या लढाईत प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत. याच स्तंभाला दरवर्षी दलित समाज अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
…डॉ. बाबासाहेबांनी दिली होती विजयस्तंभास भेट–1 जानेवारी 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली होती. त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी 1 जानेवारीला मोठ्या संख्येने दलित समाज व आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात. दरवर्षी मोठ्या उत्साहाने अनुयायी या विजस्थंभाला अभिवादनासाठी येत असतात.

पुण्याच्या जवळ असलेले भीमा कोरेगाव येथे दरवर्षी वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला हजारो दलित बांधव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. 1818 साली झालेल्या युद्धात पेशव्यांवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून येथे मोठा विजय स्तंभ उभारण्यात आला आहे. त्यावर महार बांधव ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांची नावे यावर कोरली गेली आहेत. या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने दलित बांधव येथे जमतात.
2018 साली या युद्धाला 200 वर्ष पूर्ण झाली होती त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक येथे जमले होते. मात्र, या कार्यक्रमाला गालबोट लागले आणि हिंसक घटना घडल्या. या घटनांची सुरुवात भीमा कोरेगावजवळ असलेल्या पाबळ आणि शिक्रापूर येथून झाली. या गावांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आणि यात एका तरुणाचा मृत्यू झाला. याचे पडसाद राज्यभर उमटले. या सगळ्या घटना तर आपल्याला माहीत आहेतच. पण काय आहे या सर्व घटनांमागचा इतिहास? कुठून होते याची सुरुवात?

इंग्रज विरुद्ध पेशवे युद्ध
1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये युद्ध झाले होते. या युद्धात इंग्रजांनी विजय मिळवला होता. इंग्रजांच्या या विजयाचा जल्लोष दलित समाज साजरा करतो, कारण इंग्रजांच्या या सैन्यात मोठ्या संख्येने महार समाजाचे सैनिक होते. त्यांना इंग्रजांनी सैनिकांचा दर्जा दिला होता. त्याकाळी आपल्याकडे महारांना अस्पृश्य मानले जात होते. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना सैन्यात संधी देणे हीच मोठी गोष्ट वाटत होती. समाजात होणारे अत्याचार आणि सवर्णांकडून होणारा रोजचा अपमान याला दलित समाज कंटाळला होता. अखेर इंग्रजांनी त्यांना संधी देत त्यांचा मराठ्यांविरोधात चपखल वापर केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.इंग्रजांनी भारतात आल्यानंतर आपल्याकडे असलेल्या जातीभेदाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. ‘फोड आणि राज्य करा’ हा त्यातूनच त्यांनी मार्ग निवडला होता. नेमके हेच त्यांना मराठा साम्राज्यात सुद्धा दिसून आले. इथे मराठा साम्राज्य असले तरी पेशवाईची राजवट आहे. त्यात दलितांना मान दिला जात नसल्याचे इंग्रजांना समजले. तसेच या पेशव्यांच्या विरोधात त्यांच्याच साम्राज्यात अनेक घटक आहेत, त्यांना एकत्र आणून इंग्रजांच्या सैन्यात भरती करून घेत त्यांच्याच राज्याच्या विरोधात लढाईत उतरवण्याचा मनसुबा इंग्रजांनी आखला आणि तो यशस्वी झाला.

दलित चळवळीच्या इतिहासातील महत्त्वाची लढाई
कोरेगावच्या युद्धात दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वात मराठ्यांचे 28 हजारांचे सैन्य सज्ज करण्यात आले होते. आक्रमणावेळी त्यांच्यासमोर इंग्रज सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली. या तुकडीत 800 सैनिकांचा समावेश होता. पेशव्यांनी कोरेगाव येथे असलेल्या इंग्रजांच्या सैन्यावर आक्रमण करण्यासाठी 2000 सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली. फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वात इंग्रजांच्या सैन्याने 12 तास ही खिंड लढवली आणि पेशव्यांना माघार घेण्यास भाग पाडले. कारण त्याच वेळी जनरल जोसेफ स्मिथ यांच्या नेतृत्वाखालील मोठे सैन्य दाखल झाले तर युद्ध करणे अवघड जाईल म्हणून मराठा सैन्याने परतण्याचा निर्णय घेतला. या लढाईत इंग्रजांच्या सैन्यात भारतीय वंशाचे काही सैनिक होते. यात बहुतांश महार समाजाचे होते. त्यामुळेच ही लढाई दलित समाजाकडून दलित चळवळीच्या इतिहासातील महत्त्वाची मानली जाते.
500 महार सैनिकांनी 25 हजार मराठ्यांना रोखले
‘अ हिस्टरी ऑफ द मराठाज’ या पुस्तकात जेम्स ग्रांट डफ यांनी या लढाईचा उल्लेख केला आहे. रात्रभर चाललेल्या लढाईनंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला सकाळी दहा वाजता ईस्ट इंडिया कंपनीचे अर्थात इंग्रजांचे सैन्य भीमा नदीच्या किनाऱ्यावर पोहचल्याची नोंद आहे. 500 महार सौनिकांनी तिथे 25 हजार मराठ्यांना रोखले होते. इकडे इंग्रजांचे सैन्य नदीच्या दिशेने मार्गक्रमण करत राहिले. ते नदी पार करतील असे पेशव्यांच्या सैन्याला वाटत होते. पण ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीने वाटेतल्या गावावर कब्जा केला.
महारांना रस्त्यावर थुंकण्याचीही परवानगी नव्हती
या लढाईत महार समुदायाने परकीय इंग्रजांना मदत का केली? याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर पेशवाई सुरू झाली, तेव्हा पेशवाईमध्ये जातीभेद मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात महारांना व इतर मागासवर्गीयांना देखील मानाचे स्थान होते. मात्र पेशव्यांच्या काळात महारांना अस्पृश्य समजत त्यांच्यावर अत्याचार सुरू झाले. हे अत्याचार आणि देण्यात येणारी वागणूक अत्यंत वाईट होती. ‘द ट्राईब्स अँड कास्टस ऑफ द सेन्ट्रल प्राविंसेस ऑफ इंडिया’ (1916) या पुस्तकात आर. व्ही. रसाळ लिहतात की, ‘पेशव्यांच्या राजवटीतील महारांना रस्त्यावर थुंकण्याचीही परवानगी नव्हती. म्हणूनच महारांच्या गळ्यात मटके लटकवले जात होते. रस्त्यातून चालताना पावलांचे ठसे मिटावेत म्हणून त्यांच्या कंबरेला काटेरी झाडाची फांदी बांधली जायची. ज्यामुळे महाराच्या पायांचे चालण्याचे ठसे मिटत असे. ब्राह्मण दिसल्यावर महारांची सावलीही ब्राह्मणावर पडू नये म्हणून त्यांना त्यांच्यापासून काही अंतरावर जमिनीवर तोंड करून झोपावे लागत होते. महार अथवा मांगांची सावली ब्राह्मणावर पडली तर, आंघोळ करून आपली अशुद्धता दूर करेपर्यंत ब्राह्मण अन्न पाणी खात नव्हते.’
महारांनी इंग्रजांच्या सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला
ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्या सैन्यात महार व इतर दलित समाजांना भरती करण्यास सुरू केले होते. सैन्यात भरती होणे ही आपल्या आत्मसन्मानासाठी मोठी गोष्ट असून समाजात आपले स्थान बदलेल या विचाराने महार समाजाने इंग्रजांच्या सैन्यात भरती होण्यास सुरू केले. जशी शिवरायांच्या सुरुवातीची राजवट खालच्या जातीतील रामोशी, महार आणि मांग पायदळाच्या लष्करी नौकेवर बांधली गेली होती, त्याचप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीने आपली सत्ता स्थापन करण्यासाठी दलितांना सैन्यात भरती करण्यास सुरू केले, असे लेखक कॉंस्टेबल यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. बॉम्बे गॅरिसन सैन्यात मोठ्या संख्येने खालच्या जातीतील लोकांचा समावेश होता. पेशव्यांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी महारांनी इंग्रजांच्या सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला.
साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषिकेश कांबळे एकेठिकाणी या लढाईबद्दल सांगतात, महार समाजाचा समावेश असलेल्या तुकडीने मराठ्यांना नाही तर ब्राह्मणांना (ब्राह्मण्यवाद) नमवले होते. ब्राह्मणांनी जबरदस्तीने अस्पृश्यता लादल्याने महार समाज नाराज होता. ही अनिष्ठ पद्धत बंद करण्याची विनंती महारांनी ब्राह्मणांना केली. मात्र, त्यांचे कोणीही ऐकले नाही. या कारणांमुळेच महारांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा निर्णय घेतला.पुढे ऋषिकेश कांबळे सांगतात, ब्रिटिश सैन्याने महार समाजातील व्यक्तींना लष्करी प्रशिक्षण दिले आणि पेशव्यांच्या विरोधात लढण्याची प्रेरणा दिली. मराठा शक्तीच्या नावावर ब्राह्मणांची पेशवाई होती, त्याविरुद्धची ही लढाई होती. महारांनी या लढाईत ब्राह्मणांना हरवले. महार आणि मराठा यांच्यादरम्यान मतभेद किंवा संघर्ष कधीच नव्हता. इतिहासात अशा वादाची उदाहरणही नाहीत. ब्राह्मणांनी अस्पृश्यतेची प्रथा बंद केली असती तर ही लढाई कदाचित झालीच नसती. मराठ्यांचे नाव घेतले जाते कारण मराठ्यांचे राज्य पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती होते. ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची मोठी लढाई होती. ब्रिटिशांना त्यांना नमवायचे होते. म्हणूनच ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतले आणि पेशवाई संपुष्टात आणली.
पेशव्यांच्या काळातील दलितांची अवस्था
18व्या आणि 19व्या शतकात ब्राह्मणवादाचे कट्टर स्वरूप शिखरावर पोहोचले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘जातीचे उच्चाटन’ या पुस्तकात त्यावेळच्या स्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘पेशव्यांच्या राजवटीत महाराष्ट्रात या अस्पृश्यांना ज्या रस्त्यावरून उच्चवर्णीय हिंदू चालत होते त्या रस्त्यावरून चालण्याची परवानगी नव्हती. हिंदूंनी त्यांना चुकूनही हात लावू नये म्हणून त्यांच्या मनगटात किंवा गळ्यात काळा धागा बांधण्याचा आदेश त्यांना होता. पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्यात अस्पृश्यांना कंबरेला झाडू बांधून चालण्याचा आदेश होता, जेणेकरून त्यांच्या पावलांचे ठसे झाडूने पुसले जातील आणि त्यांच्या पावलांच्या ठशांवर पाऊल ठेवून कोणताही हिंदू अपवित्र होणार नाही. अस्पृश्यांना त्यांच्या गळ्यात मटका बांधून फिरावे लागायचे, त्यांना थुंकायचे असेल तर त्यातच त्यांना थुंकावे लागायचे, कारण जमिनीवर त्यांनी थुंकले आणि त्यावर चुकून कुठल्या हिंदुचा पाय पडला तर ते अपवित्र झाले असते.
सावित्रीबाई फुलेंनी पेशव्यांचा लेखणीतून केला विरोध

सावित्रीबाई फुले यांनीही एकेठिकाणी इंग्रज राजवटीचे समर्थन करत पेशवाई वाईट म्हटले असल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी पेशवाईत दलित आणि महिलांना मूलभूत अधिकार नसल्याचा दाखला दिला आहे. सावित्रीबाई त्यांच्या ‘अंग्रेजी मैय्या’ या कवितेत म्हणतात:
अंग्रेजी मैय्या, अंग्रेजी वाणई शूद्रों को उत्कर्ष करने वाली पूरे स्नेह से.
अंग्रेजी मैया, अब नहीं है मुगलाई और नहीं बची है अब पेशवाई, मूर्खशाही.
अंग्रेजी मैया, देती सच्चा ज्ञान शूद्रों को देती है जीवन वह तो प्रेम से.
अंग्रेजी मैया, शूद्रों को पिलाती है दूध पालती पोसती है माँ की ममता से.
अंग्रेजी मैया, तूने तोड़ डाली जंजीर पशुता की और दी है मानवता की भेंट सारे शूद्र लोक को.
सावित्रीबाई फुले पुढे लिहितात:पेशवा ने पांव पसारे उन्होंने सत्ता, राजपाट संभाला,
और अनाचार, शोषण अत्याचार होता देखकर शूद्र हो गए भयभीत,
थूक करे जमा गले में बँधे मटके में और रास्तों पर चलने की पाबंदी,
चले धूल भरी पगडंडी पर, कमर पर बंधे झाड़ू से मिटाते पैरों के निशान.
या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात येते की, पेशव्यांच्या काळात मराठा साम्राज्य विस्तारले, मात्र राज्यातील जातीभेद, अस्पृश्यता, ब्राह्मणवाद या सगळ्या गोष्टींमुळे अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आणि याचे रूपांतर थेट क्रांतीत घडले.
(We do not guarantee or take responsibility for any events, events or information in history. This information is compiled.)