सुदर्शन घुले महाराष्ट्रातच लपल्याची शक्यता-तपास यत्रणांच्या मते, सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच कुठेतरी, तर कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे हे राज्याबाहेर लपल्याचा संशय आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांचा शोध घेतला जात आहे. सीआयडीची टीम बुधवारी सकाळीच सुदर्शन घुलेच्या केज तालुक्यातील टाकळी गावात पोहोचली आहे.
बीड- मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड अखेर सीआयडीच्या जाळ्यात सापडला आहे. त्याला मंगळवारी रात्री उशिरा केज कोर्टात हजर करण्यात आले. तिथे त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. यावेळी झालेल्या युक्तिवादात सरकारी वकिलांनी वाल्मीक कराडच्या 1999 पासूनच्या गुन्ह्यांची यादी सादर केली. यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचा दावा केला जात आहे.
वाल्मीक कराड मंगळवारी दुपारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला होता. त्यानंतर त्याला रस्ते मार्गाने बीडच्या केज कोर्टापुढे हजर करण्यात आले. यासंबंधी रात्री 11 च्या सुमारास न्यायमूर्ती एस व्ही पावसकर यांच्या न्यायदालनात सुनावणी झाली. त्यात वाल्मीकला 14 दिवसांच्या सीआयडी कोठडीत पाठवण्यात आले.
तत्पूर्वी सरकारी व बचाव पक्षाच्या वकिलांत जोरदार युक्तिवाद झाला. सरकारी वकिलांनी वाल्मीकच्या कोठडीसाठी या प्रकरणाशी निगडीत काही मुद्दे मांडले. यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचाही समावेश होता. प्रस्तुत प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडच्या निर्देशांनुसार काम करत होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी वाल्मीक कराडच्या कोठडीची आवश्यकता आहे, असे सरकारी वकील म्हणाले.
सरकारी वकिलांच्या या युक्तिवादावर बचाव पक्षाच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला. आपल्या अशिलाचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे नमूद करत त्यांनी त्याच्या जामिनाची मागणी केली. त्यावर सरकारी वकिलांनी वाल्मीक कराडच्या 1999 पासूनच्या गुन्ह्यांची यादीच कोर्टापुढे सादर केली. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वाल्मीक कराडला 14 दिवसांच्या सीआयडी कोठडीत पाठवले.
माझ्या अशिलाविरोधात खंडणीची तक्रार आहे. पण त्यात कुठेही 2 कोटी रुपये मागितल्याचा उल्लेख नाही. विष्णू चाटेचा मोबाईल नाशिकमध्ये आढळला. त्याने वाल्मीक कराडच्या ऑफिसमध्ये आल्याचे सांगितले, पण केव्हा हे स्पष्ट झाले नाही. आमचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रस्तुत प्रकरणात आरोपी स्वतःहून पोलिसांना शरण आला. त्यामुळे त्याच्या 15 दिवसांच्या कोठडीची गरज नाही, असे वाल्मीक कराडचे वकील म्हणाले.
सीआयडीकडून आज वाल्मिक कराडच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. आज त्याच्या चौकशीचा पहिला दिवस आहे. बीड शहर पोलिस ठाण्यातील एका बंद खोलीत सीआयडीचे अधिकारी त्याची झाडाझडती घेत आहेत. सीआयडीने संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या 2 भावांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.
सीआयडी सुदर्शन घुलेच्या मागावर
संतोष देशमुख हत्येप्रकरणात सीआयडी आता मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या मागावर आहे. सुदर्शन घुले या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. त्याच्यासह त्याचे 2 साथीदार सध्या पसार आहेत. गेल्या 22 दिवसांपासून त्यांचा शोध घेतला जात आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले सापडल्यास या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. विशेषतः संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींना कुणाला व्हिडिओ कॉल केला? हे ही स्पष्ट होईल. त्यामुळे त्याचा आता कसून शोध घेतला जात आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे वाल्मीक कराडने शरण येण्यापूर्वी एका व्हिडिओद्वारे आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. तो आपल्या व्हिडिओत म्हणाला होता की, मी वाल्मीक कराड. माझ्याविरोधात बीडच्या केज पोलिस ठाण्यात खंडणीची खोटी फिर्याद दाखल केली आहे. मला अटकपूर्व जामीनाचा अधिकार असताना मी पुणे सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे मारेकरी जे कुणी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलिस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे.