गोसेवा क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन ; देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती तालुका निहाय प्रशिक्षण पुण्यात
पुणे : भारतीय कृषी व्यवस्थेत देशी गोवंशाचे महत्व अनन्यसाधारण आहे. भूमी सोपोषणासाठी देशी गोवंश अत्यंत उपयुक्त असून नैसर्गिक शेती उत्पादक अनेक शेतकरी आपल्याकडे आहेत. त्यांच्यासह सर्वच शेतकरी वर्गापर्यंत देशी गोवंश नैसर्गिक शेती व रासायनिक शेती याचा तुलनात्मक फरक सांगून देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती उपयुक्त असल्याचे मार्गदर्शन गोसेवा क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले.
महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय विशेष उपक्रम अंतर्गत देशी गोवंश आधारित नैसर्गिक (रसायन मुक्त) शेती प्रशिक्षण क्रमांक १ तालुका हवेली – जिल्हा पुणे चे आयोजन शुक्रवार पेठेतील भारत भवन देशपांडे टूटोरियल्स हॉल येथे करण्यात आले होते. यामध्ये ५० हून अधिक शेतकरी व स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
उद्घाटनप्रसंगी गोसेवा आयोग सदस्य डॉ. नितीन मार्कंडेय, विश्व हिंदू परिषद गो रक्षा विभाग प्रांत संयोजक महेंद्र देवी, पशधुन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. प्रकाश काळे, राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्र मुख्य संयोजक विजय वरुडकर, ग्राम विकास प्रमुख विनय कानडे, कृषी तज्ञ जगन्नाथ तात्या मगर, डॉ. संतोष चव्हाण, विश्व हिंदू परिषद गो रक्षा विभाग सह संयोजक कौस्तुभ देशपांडे, विजया घुले, हेमंत निम्हण, संतोष लाटणेकर, नंदकुमार भोपे, नाना नलगे आदी गो कृषी विषयात काम करणारे अभ्यासक उपस्थित होते.
विजय वरुडकर म्हणाले, जगभरात जमिनी नापीक होत आहेत. त्या वाचवण्यासाठी देशी गोवंश आधारित रसायन मुक्त शेती ची गरज आहे. गो सेवा आयोग व पशु संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगाने राज्यातील दहा जिल्ह्यात ११७ तालुक्यातून आम्ही देशी गोवंश आधारित रसायन मुक्त शेती प्रशिक्षण आयोजित करत आहोत. ज्यात किमान पाच हजार शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ नितिन मार्कंडेय यांनी सुदृढ देशी गो वंश जतन करण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशी गोवंश आधारित रसायन मुक्त शेती प्रसार व्हावा यासाठी राष्ट्रीय कर्तव्य अभियान द्वारे मोफत गो-कृपाआमृता चे वाटप करण्यात आले. या प्रशिक्षण अंतर्गत, बीज संस्कार पद्धती, भारतीय बीज बँक निर्मिती, माती परीक्षण व पाणी परीक्षण आवश्यकता, गांडूळ खत निर्मिती, नैसर्गिक खत बँक निर्मिती, गो कृपामृत निर्मिती पद्धत, बांधावरची प्रयोग शाळा,अशा अनेक विषयांवर शिबीरात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासकीय योजनांची माहिती देखील देण्यात आली.
या वेळी राष्ट्रीय कर्तव्य अभियान द्वारा आत्मनिर्भर गौ-ग्राम अभियान हा विशेष प्रकल्प सुरु असल्याची माहिती देण्यात आली. ज्ञानेश्वर शिंदे यांनी सूत्र संचालन तर सुनील बेनके यांनी आभार मानले. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहा द्वारे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.