पुणे-देशाला सर्वाधिक करनिधी देणाऱ्या महाराष्ट्राला मोदी सरकार सावत्र वागणूक देत असून महायुतीच्याच कालखण्डात महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत कपात तर अमली पदार्थात वाढ, अशी वस्तुस्तिथी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी केला आहे.
राज्य निधी वाटप अंतर्गत उत्तर प्रदेशला जवळपास २५ हजार कोटी , बिहारला व आंध्र प्रदेशला प्रत्येकी सुमारे १४ हजार कोटी, मध्य प्रदेशला ११ हजार कोटी, ओडिसाला ७ हजार कोटी तर महाराष्ट्राला मात्र अवघा ८ हजार कोटीं रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची आकडेवारीच गाडगीळ यांनी सादर केली असूनही महायुतीचे नेते यावर का मौन बाळगून आहेत असा सवालही त्यांनी केला आहे.
२०४७ पर्यंत ” अमली पदार्थ मुक्त भारत ” करण्याची गर्जना करणाऱ्या पंतप्रधान मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षाच्या काळात सुमारे ५.५ लाख किलोचे तब्ब्ल २० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. केंद्र सरकारनीच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमली पदार्थांचा एवढा साठा जर पकडला जात असेल तर कुणाच्या राजवटीत अमली पदार्थाचे सेवन वाढल्याचे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही असा उपरोधक टोमणाही गाडगीळ यांनी लगावला आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे, अवघ्या काही महिन्यापूर्वीच जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या साठा वरून मुंबई – पुण्यासारख्या शहरातून महायुती सत्तेवर असताना, सेवनाचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे सिद्धच होते आहे असेही गाडगीळ यांनी म्हंटले आहे.