पुणे : झाड तोडले जात असताना त्यालाही प्रचंड वेदना होतात. ते आक्रोश करते, किंचाळतेही. झाडाला शाश्वत सुरक्षिततेची जाणीव करून दिल्यास ते आपल्याशी मैत्री करते, संवाद साधते, अशा भावना नक्षत्र वन उभारणारे दीपक जोशी यांनी व्यक्त केल्या. झाडे कधीही फसवत नाहीत, ती मतलबी नसतात तर कायम आधारस्तंभच असतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
वृक्षांना भावभावना असतात त्या जाणून पाच हजारांपेक्षा जास्त वृक्ष लावून त्यांचे संगोपन करणारे तसेच भारतातले पहिले संस्कारित वृक्षांचे नक्षत्र वन उभारणारे दीपक जोशी यांचा संवाद, पुणे, भावार्थ आणि अक्षरसेवा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योतिष विद्यावाचस्पती आरती घाटपांडे यांच्या हस्ते ‘वृक्षसखा पुरस्कार’ देऊन आज गौरव करण्यात आला. त्या व्ोळी सत्काराला उत्तर देताना जोशी बोलत होते. आयुर्वेदाचार्य डॉ. वेदिका साधले यांची प्रमुख उपस्थिती होती. अक्षरसेवाच्या विनिता पिंपळखरे, संवाद, पुणेचे सुनील महाजन, भावार्थच्या कीर्ती जोशी मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप असे पुरस्काराचे स्वरूप होते. कोथरूड येथील भावार्थ पुस्तक दालनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दीपक जोशी म्हणाले, गुरूंच्या आदेशानुसार नक्षत्र वनाच्या निर्मिती कार्यास प्रारंभ केला. त्यांनी मला वनस्पतींशी संवाद साधण्याचे तंत्र शिकविले. वनस्पतींनीही मला खूप शिकविले, सतत मार्गदर्शन केले. झाडे एकमेकांशीही संवाद साधतात. मला झाडांशी बोलायला आवडते. प्रत्येक झाडाचा स्वभाव सुंदरच आहे, तो कळण्यासाठी त्याच्याशी दोस्ती होणे आवश्यक आहे. झाडांमध्ये जातीयवाद नाही, मोठे झाड कायमच लहान झाडाची काळजी घेते. अनेक झाडांना संगीत आवडते, असे सांगताना नक्षत्र वनात एका सुहृदांनी माऊथ ऑर्गनवर गाणे वाजविल्यावर बकुळीचे झाड कसे डोलू लागले याचा अनुभवही त्यांनी सांगितला. चैत्य वन, बोधी वन, नक्षत्र वन, शांती वन, गणेशमंत्र वन, पसायदान वन, देवराई आदी वनांची निर्मिती झाडांवरील प्रेमातून झाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
आरती घाटपांडे म्हणाल्या, वृक्षांवर संस्कार, माया करून, संवाद साधत नक्षत्र वनाची निर्मिती करणारे दीपक जोशी फक्त वृक्षसखाच नाही तर वृक्षांचा प्राणसखा आहेत. प्रत्येक वृक्षाबद्दलचे त्यांचे ज्ञान अगाध आहे. नक्षत्रांचा अभ्यास करताना जोशी यांचे नक्षत्र वृक्षांचे ज्ञान अनुभवायला मिळाले. नक्षत्र वृक्षांच्या सान्निध्यात राहणे हे आपल्याला पोषक ठरू शकते, त्यांच्यातून येणारी स्पंदने पूरक ठरतात.
सुरुवातीस विनिता पिंपळखरे यांनी पुरस्कारच्या आयोजनामागील भूमिका विशद करताना वृक्षांनाही भावभावना असतात, वृक्षांवर अफाट प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची जाणीव ठेवावी या उद्देशाने पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
डॉ. वेदिका साधले म्हणाल्या, दीपक जोशी यांनी निर्माण केलेले नक्षत्रवन संस्कारित आहे. ते वनस्पती संगोपनाचे, त्यांच्या पालन-पोषणाचे कार्य निस्पृहपणे करत आहेत. आयुर्वेद अभ्यासकांना त्यांच्या ज्ञानाचा, नक्षत्र वनाचा नक्कीच उपयोग होईल. समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी जोशी यांचे काम मोलाचे ठरणार आहे.
सन्मापत्राचे लेखन वलय मुळगुंद यांचे होते तर वाचन कीर्ती जोशी यांनी केले. सूत्रसंचालन मेधा गोखले यांनी केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.