नागपूर- काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी दुपारी नागपूरमध्ये पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे दोन रोड शो आयोजित केले होते. त्यापैकी एक रॅली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल ते बडकस भागापर्यंत होती. तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी कमळाचे झेंडे घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने -सामने येऊन तणाव निर्माण झाला होता. मात्र “भाजपच्या समर्थकांना मी शुभेच्छा देते, पण जिंकणार तर महाविकास आघाडीच,’ असे म्हणत प्रियंका यांनी आणखी चिथावले. त्यामुळे पुन्हा घोषणाबाजी वाढली. तणाव वाढल्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार करून गदारोळ करणाऱ्यांना बाहेर काढले.
प्रियंका गांधींनी प्रथमच नागपूरकरांशी संवाद साधला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. यापूर्वी इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया व राहुल गांधी नागपुरात प्रचारासाठी आले होते. मात्र, प्रियंका यांचा हा पहिलाच दौरा होता. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील त्यांचा राेड शो उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. मध्य नागपूर मतदारसंघात मात्र भाजप कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याने त्यास गालबोट लागले.