मुंबई- अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रचारासाठी तयार केलेली नवीन जाहिरात अडचणीत आली आहे. त्यात ‘घड्याळाला मतदान केले नाही तर तुम्हाला रात्री जेवायला देणार नाही,’ असे एका पत्नीचे पतीला उद्देशून वाक्य आहे. त्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. हे वाक्य काढल्यानंतरच जाहिरात मंजूर करू, असे बजावले.
कुठलीही जाहिरात आयोगाकडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रकाशित करता येत नाही, असा नियम आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या जाहिरातीतील काही भागावर, वाक्यावर आक्षेप घेतला आहे. जाहिरातीत पतीला उद्देशून पत्नी जे वाक्य बोलते हा प्रकार एक प्रकारे नवऱ्याला दिलेली धमकी आहे, असे आयोगाचे म्हणणे आहे. विशिष्ट पक्षाला मतदान न दिल्याने कुणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असे आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळे हा भाग काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रवादीच्या जाहिरातीत घड्याळ चिन्ह वापरताना त्याखाली ठळक शब्दात ‘न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून’ असे लिहा तसेच शरद पवार यांचा फोटो बोर्डवर वापरू नका, असे आदेश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी सर्वाेच्च न्यायालयात होणार आहे.