गुवाहाटी-मणिपूरच्या इंफाळ खोऱ्यातील सहा जिल्ह्यांत रविवारीही तणाव होता. रविवारी सायंकाळी संतप्त जमावाने भाजप आमदाराचे घर पेटवून दिले. एका अपक्ष आमदाराच्या इमारतीत तोडफोड केली. दोन दिवसांत तीन मंत्र्यांसह ९ आमदारांच्या घरांवर हल्ले झाले. त्यामुळे प्रशासनाने या जिल्ह्यांतील संचारबंदी शिथिल केली नाही. सात जिल्ह्यांत दुसऱ्या दिवशीही इंटरनेट बंद होते.
संपूर्ण खोऱ्यात पहिल्यांदाच मोठा सुरक्षा ताफा तैनात आहे. म्हणूनच अशा अनेक मंत्री-आमदारांनी नातेवाइकांना राज्याबाहेर हलवले आहे. गेल्या ५६५ दिवसांपासून हिंसाचार सुरूच आहे. त्याची झळ राज्यातील भाजप सरकारपर्यंत पोहोचली आहे. सरकारमधील नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) रविवारी सायंकाळी सत्ताधारी भाजप सरकारचा पाठिंबा काढला. पक्षाने भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र पाठवून तसे कळवले. राज्याच्या विधानसभेत एनपीपीचे ७ आमदार आहेत. भाजपचे १४ व इतर पाच आमदार राजीनाम्याच्या तयारीत आहेत. एक दिवस आधी भाजपच्या १९ आमदारांचे एक पत्र समोर आले होते. त्यात मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना हटवण्याची मागणी आहे.
एनपीपीचे एक आमदार म्हणाले, शनिवारी मैतेईच्या आंदोलकांनी एनपीपी आमदार रामेश्वर सिंह यांना घरातून बाहेर काढून ट्रॅफिक पाॅइंटला बांधून बेदम मारहाण केली. त्यात आमदार गंभीर जखमी झाले आहेत. सुरक्षा व्यवस्थेची ही स्थिती आहे. येथे सामान्य नागरिकही सुरक्षित नाही. म्हणूनच आम्हाला सरकारमध्ये राहण्याची इच्छा नाही.
रविवारी सकाळी पाेलिसांनी आसामच्या कछार जिल्ह्यातील बराक नदीपात्रातून आणखी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. परंतु मृतदेहाची आेळख पटलेली नाही. परंतु बेपत्ता सहा मैतेईंपैकी ही एक असावी, असा संशय आहे. मृतदेह सापडलेले ठिकाण जिरीबामच्या सीमेजवळ आहे. आणखी एक मृतदेह आढळल्याने जिरीबाममध्ये दहशत व तणावपूर्ण स्थिती आहे.
६० जागांच्या मणिपूर विधानसभेत भाजपचे ३२ आमदार आहेत. २०२२ मध्ये बिरेन सिंह सीएम बनले तेव्हा भाजपशिवाय नागा पीपल्स फ्रंटचे ५, एनपीपीचे ७, जदयू-५, ३ अपक्षांसह ५२ आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. त्यात २७ मैतेई व ७ कुकी आमदार आहेत. आता ७ एनपीपी व ३ अपक्षांनी पाठिंबा काढून घेतला. २०२३ पासून ७ कुकी आमदार बाहेर आहेत. म्हणजे एकूण १७ आमदार बाहेर पडले. आता भाजपसोबत ३५ आमदार आहेत. बहुमतासाठी ३१ संख्या हवी. शिवाय भाजपच्या १४ आमदारांनी बिरेन यांना हटवण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. त्यामुळे सरकार अडचणीत येऊ शकते.
शनिवारी गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूर प्रकरणात दिल्लीत महत्त्वाची बैठक घेतली. सोमवारीही ते बैठक घेतील. सूत्रानुसार गृह मंत्रालयाने रविवारी सायंकाळी कुकी समुदायाने १० आमदारांशी संपर्क साधला. त्यात ७ भाजपचे आहेत.१५ ऑक्टोबरला गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी कुकी-मैतेई तसेच नागा नेत्यांसोबत बैठक घेतली होती. मणिपूरमध्ये आता गोळीबार होणार नाही, असे ठरले होते. परंतु तेव्हापासून ८-१० हिंसक घटना घडल्या.