पुणे, दि. १७ नोव्हेंबर, २०२४ : ‘”महायुती सरकारने देशातील सर्वाधिक ५२ टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. वेदांता, टाटा एअरबस, फॉक्सकॉनसारखे प्रकल्प महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांच्याच काळात राज्याबाहेर गेले. काँग्रेस आघाडी वारंवार खोटे बोलत असली,तरी त्यामुळे मतदार भ्रमित होणार नाहीत. मतदारांचा महायुतीने केलेल्या विकासावर विश्वास आहे, असा विश्वास शिवाजीनगरचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला. शिवाजीनगर मतदारसंघात आयोजित युवा मेळाव्यात ते बोलत होते. तरुण मतदार, महिला आणि नागरिकांची या वेळी प्रचंड गर्दी होती. याबरोबरच खडकी बाजार व पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या कार्यक्रमांना शिरोळे यांनी उपस्थिती लावली.
यावेळी बोलताना आमदार शिरोळे म्हणाले, ‘‘२०१४ ते २०१९ या कालखंडात भाजपा महायुती सरकारने महाराष्ट्राला देशात अव्वल क्रमांकावर ठेवले. २०१९ नंतर जनादेशाचा अपमान करून सत्तेत आलेले आघाडी सरकार इतके निष्क्रिय होते, की अडीच वर्षांत त्यांनी गुंतवणूक समितीची बैठकसुद्धा घेतली नाही. हा नाकर्तेपणा झाकण्यासाठी खोटे बोलणाऱ्यांना घरी बसवून भाजपा महायुतीला विजयी करण्याचा संकल्प आता जनतेने केला आहे.’’
मतदारांना फसवता येईल, असे महाविकास आघाडीला वाटते. पण जनता सजग आहे. मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, महामार्ग, उड्डाणपूल, कोस्टल रोड, अटल सेतू सागरी मार्ग, वाढवण बंदराची मुहूर्तमेढ असे शेकडो मेगा प्रोजेक्टस् भाजपा महायुती सरकारने केले. महाराष्ट्राच्या पुढच्या पन्नास वर्षांच्या अर्थकारणाचा पाया यातून रचला गेला आहे. गेल्या साडेसात वर्षांच्या सत्ताकाळातील प्रगतीचा हा वेग महाराष्ट्राने गेल्या कित्येक दशकात गाठला नव्हता, हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.
‘‘दीर्घकाळ राज्याच्या सत्तेत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकसंख्येची प्रचंड वाढ होत असताना पायाभूत सुविधा वेळेत निर्माण केल्या नाहीत. त्यामुळे शहरीकरणाच्या अनेक समस्या आज निर्माण झाल्या. त्यावर भाजपा महायुतीच गांभीर्याने काम करीत आहे. पुढच्या पिढ्यांसाठी रोजगारक्षम, विकासाभिमुख महाराष्ट्र घडवायचा असेल, तर भाजपा महायुती सरकारला पुन्हा निवडून दिले पाहिजे, हे आता मतदारांनी ओळखले असल्याचे शिरोळे म्हणाले.
जातीपातीत विष कालवून सत्ता मिळविण्याचे महाविकास आघाडीचे जुनाट राजकारण आजच्या पिढीने फेकून दिले आहे. त्यांना रोजगार हवे आहेत. चांगले आयुष्य जगायचे आहे. स्वतःच्या परिवारासाठी आनंदी शहरे त्यांना हवी आहेत. वाहतुकीच्या सुविधा हव्या आहेत. सुरक्षितता पाहिजे. हे सगळे देण्याची क्षमता भाजपा महायुतीकडे आहे. म्हणूनच सुजाण मतदार प्रचंड संख्येने घराबाहेर पडून भाजपा महायुतीला मतदान करण्यास उत्सुक आहे याकडे शिरोळे यांने लक्ष वेधले.