मतदान केल्यानंतर मतदान केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून त्यासाठी मतदान केंद्राबाहेरील स्टीकरवरचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर उघडणाऱ्या फॉर्ममधील माहिती अचूक भरावी तसेच मतदानाची शाई असलेल्या बोटासोबतचा सेल्फी अपलोड करावा. त्यानंतर आपण फॉर्ममध्ये भरलेल्या ई-मेल वर आपले मतदान केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.
पुणे: मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुणे जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत; त्याअंतर्गत दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यास मतदाराला प्रमाणपत्र मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग (स्वीप) अंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र ही मतदारासाठी गौरवाची बाब असणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी त्याचा लाभ होणार आहे. मतदारांना मतदानाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी एक क्यूआर कोड तयार करण्यात आला असून त्याचे स्टीकर्स सर्व विधानसभा मतदार संघांना वितरीत करण्यात आले आहेत.
मतदान केल्यानंतर मतदान केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून त्यासाठी मतदान केंद्राबाहेरील स्टीकरवरचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर उघडणाऱ्या फॉर्ममधील माहिती अचूक भरावी तसेच मतदानाची शाई असलेल्या बोटासोबतचा सेल्फी अपलोड करावा. त्यानंतर आपण फॉर्ममध्ये भरलेल्या ई-मेल वर आपले मतदान केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. दिवसे यांनी केले आहे.