पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराला उधाण आले असून, या प्रचार मोहिमेत मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर केला जात आहे. यात ओपन जिप्सी, ओपन ट्रक, सनरूफ असलेली वाहने, आणि एलईडी व्हॅन यांची मागणी वाढली आहे. या वाहनांना निवडणूक प्रचारात वापरण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य असून, आत्तापर्यंत पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) 60 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती आरटीओ प्रशासनाचे पराग बर्वे यांनी दिली.
निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या वाहनांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी आवश्यक आहे. परवानगी नसलेल्या किंवा परमिट नसलेल्या वाहनांचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येणार नाही. यासोबतच, वाहनांमध्ये अतिरिक्त लाउडस्पीकर बसवण्याचे किंवा त्यात बदल करण्याचे कामही अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या वाहनाच्या परमिट कार्डाची मूळ प्रत त्या वाहनाच्या पुढच्या स्क्रीनला चिकटवणे अनिवार्य आहे, तसेच वाहन कोणत्या उमेदवाराच्या प्रचारात वापरले जात आहे हे स्पष्टपणे दर्शवणे बंधनकारक आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात एक खिडकी कक्ष तयार करण्यात आला असून, या कक्षातून सभा, पदयात्रा, लाउडस्पीकर, आणि वाहन परवान्यासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. सिंहगड कॉलेज परिसरात असलेल्या या एक खिडकी कक्षामध्ये सभा आणि वाहन परवान्यासाठी आतापर्यंत 62 अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक एम. एस. देशमुख आणि एक खिडकी कक्षाचे अधिकारी दीपक ठीकेकर, ज्ञानेश्वर मानकर, सुविद्य पवार, प्रदीप शिंदे, शैलेंद्र सोनावणे,संदीप रेणुसे या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या अर्जांची प्रक्रिया सुरू आहे.
प्रचार मोहीम अधिक तीव्र झाल्याने, वाहन परवाने घेण्यास दिरंगाई झाल्यास संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी सक्त सूचना देण्यात आली आहे. निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर खडकवासला मतदारसंघात सुरक्षित आणि नियमानुसार वाहनांची नेमणूक व्हावी, यासाठी आरटीओ आणि पोलिस प्रशासनाने काटेकोर तयारी केली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार, प्रत्येक उमेदवार आणि त्यांच्या प्रचार मोहिमेतील संबंधित व्यक्तींनी आपापल्या वाहनांना परवानगी घेण्याचे निर्देश पाळावेत, याबाबत प्रचारकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.