- सुट्टीचा योग साधत घरोघरी जाऊन हडपसरवासियांशी साधला संवाद
पुणे: हडपसर मतदारसंघात सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडीवर राहिलेल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी रविवारच्या सुट्टीचा योग साधत घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यामुळे मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना जगताप यांच्यासाठी हा रविवार प्रचारवार ठरला.
रविवारी जगताप यांनी सकाळच्या सत्रात हडपसर, गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर परिसरात, तर दुपारच्या सत्रात काळे बोराटेनगर, ससाणेनगर, हिंगणेमळा परिसरात पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. लोहिया नगर उद्यान परिसरात नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. या प्रचारयात्रेदरम्यान जगताप यांनी परिसरांतील मंदिरे, स्मारकांना अभिवादन करीत नागरिकांचे आशीर्वाद घेतले. अनेक ठिकाणी फटाके वाजवून, पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर माता-भगिनींनी औक्षण करीत ‘विजयी भव’चा आशीर्वाद दिला.
पदयात्रेत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. योगेश ससाणे, विजय देशमुख, अविनाश काळे, संजय शिंदे, प्रशांत सुरसे, नितीन आरू, गणेश बोराटे, महेंद्र बनकर, आसिफ मणियार, राहुल होले, अनिल सागरे आदी उपस्थित होते. स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत ‘एकच वादा, प्रशांत दादा’ असा जयघोष केला. येणाऱ्या काळात हडपसरच्या विकासाची हमी घेत जगताप यांनी जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच जगताप यांना चांगला प्रतिसाद दिला.
प्रशांत जगताप म्हणाले, “हडपसरच्या जनतेने आदरणीय शरद पवारसाहेब आणि माझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे. नगरसेवक, महापौर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. सेवेतून, विकासकामांतून योगदान देता आले, याचा आनंद आहे. आता हडपसर मतदारसंघाचा आमदार म्हणून मला या भागाच्या विकासासाठी विधिमंडळात आवाज उठवायचा आहे. त्यासाठी आपण मला संधी द्याल, असा विश्वास आहे. आपल्या पाठिंब्याने ही लढाई नक्की यशस्वी करू आणि येत्या काळात हडपसरचे रूप बदलू. एक सुंदर, स्वच्छ व सुसंस्कृत शहर निर्माण करू, असा शब्द देतो.”