पुणे: कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपा-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. ग्रामदेवता कसबा गणपतीचे दर्शन घेत महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. कसबा मतदारसंघासह शहराच्या वाहतुकीला गती देणाऱ्या पुणे मेट्रोतून मंडई स्टेशन ते स्वारगेट असा प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, माजीसभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, शिवसेनेचे अजय भोसले, सचिव किरण साळी, लहुजी शक्तीसेनेचे विष्णूभाऊ कसबे, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, सौ. स्वरदा बापट, कुणाल टिळक यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेली दहा वर्षातील मोदी सरकारचे तसेच राज्यातील महायुती सरकारच्या कामावर नागरिकांचा विश्वास. स्वर्गीय गिरीश भाऊ बापट, स्वर्गीय मुक्ताताई टिळक या दोघांच्या कष्टातून कसब्यामध्ये अनेक विकास कामे झाली. आज महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जमलेले हजारो नागरिक हे पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचा आमदार होणार हे दर्शवत आहे.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “राज्यामध्ये महायुतीचे लोककल्याणकारी सरकार यावे, ही जनतेची इच्छा आहे. कसबा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जमलेली कसब्याती जनता हेमंत रासने यांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसत आहे”.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हेमंत रासने म्हणाले, “गेली 18 महिन्यांमध्ये कसबा मतदारसंघात केलेल्या कामाची दखल घेऊन महायुतीने मला कसबा मतदारसंघातून लढण्याची पुन्हा एकदा संधी दिली असून वरिष्ठांनी दिलेल्या संधीबद्दल मी आभारी आहे. कसबा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने आणि महायुतीच्या एकजुटीने निश्चितच उमेदवारीचे विजयात रूपांतर होईल. गेल्या 18 महिन्यांमध्ये रस्त्यावर टेबल मांडत ५० हजारांच्यावर नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. कोणतीही समस्या असो ती सोडवण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते कायम पुढे राहिले आहेत. त्यामुळे कसब्यातील जनता निश्चितच मतदान रुपी आशीर्वाद देईल हा विश्वास आहे”.