विश्व हिंदू परिषद पुणे महानगराच्या वतीने आयोजित ‘संत संगम ‘ कार्यक्रम
पुणे : हिंदू धर्म हा सर्व समभाव मानणारा आहे, कोणालाही कमी लेखणारा, भेदभाव करणारा नाही, मात्र आपणच किती वेळा दगा सहन करायचा? आजच्या परिस्थितीत हिंदू समाजाला एकत्र आणणे महत्वाचे आहे, आपण सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे हे मान्य आहे, मात्र त्यासाठी आपण शिल्लक राहिजे पाहिजे. यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार न करता आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या उमेदवारांना आगामी विधानसभा निवडणूकीत मतदान करा, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले.
विश्व हिंदू परिषद पुणे महानगराच्या वतीने स. प . महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल मध्ये आयोजित ‘संत संगम ‘ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज बोलत होते. यावेळी भंते हर्षवर्धन शाक्य, ज्ञानी अमरजीत सिंह, ह.भ.प.चिदंबरेश्वर साखरे महाराज, १००८ किन्नर आखाडा महामंडलेश्वर दीपाजी नंदगिरी जगावली माताजी, श्री महानुभव पंथाचे रविराज दादा पंजाबी, सिंधी संप्रदायाचे संत अनंत प्रकाशजी, वाल्मिकी संप्रदायाचे कैलासनाथ व भगवान महाराज,ह.भ.प फुरसुंगीकर व ह.भ.प पळसे महाराज या धर्मगुरूंसह विहिंप महाराष्ट्र व गोवा धार्मिक विभाग संजय मुद्राळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत धर्माचार्य सह प्रमुख नागनाथ बोंगरगे, धर्माचार्य संपर्क प.म.प्रांत सदस्य समीर पायगुडे, पूर्व पुणे विभाग मंत्री धनंजय गायकवाड, पश्चिम पुणे विभाग मंत्री केतन घोडके आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले, आपला समाज, आपला देश टिकला पाहिजे, आपण देश प्रथम या भावनेने राष्ट्र वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या हिंदुस्थानाचा विस्तार प्रचंड मोठा होता, आपला देश अनेकदा संकुचित झाल्याचे दिसते भविष्यात संकुचित व्हायला जागा नाही, यामुळे आपण जगाला प्रेम देण्यासाठी आधी आपल्या सुरक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे. समाजवाद, सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता या गोष्टी एका बाजूने होणार नाहीत, देशात समान नागरी कायदा असणे आवश्यक आहे. शिवरायांचा विचार देशात रुजणे महत्वाचे आहे. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हाच हिंदुत्वाचा जाहीरनामा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना किशोर चव्हाण म्हणाले, आपण हिंदुत्वासाठी मतदान कसे होईल यांची जागृती करण्यासाठी इथे जमलो आहोत. देशाला , समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी संविधान जीवंत असणे आवश्यक आहे. हिंदू बहुसंख्यक आहे तोपर्यंतच देश आणि संविधान सुरक्षित असणार आहे यांची जाणीव सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होण्यासाठी आपला हा उपक्रम आहे.
संजय मुद्राळे म्हणाले, आपण आज संत संगम कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्माचार्यांचे विचार ऐकत आहोत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद असे अनेक संतांचे अनमोल योगदान आहे. सातव्या शतकापासून आपल्यावर असंख्य परकीय आक्रमणे झाली मात्र आपण आपला धर्म फक्त संताच्या धैर्यामुळे, मार्गदर्शनामुळे टिकवू शकलो आहोत, आजही त्यांच्या विचारांची आपल्या देशाला गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शुभम मुळूक यांनी केले.