पुणे -ज्या गाडीतून पैसे जप्त करण्यात आले ती गाडी मी अकोला येथील बाळासाहेब आजबे यांना विकली आहे. त्यांचे पैसे देखील माझ्या बँक खात्यात आले आहेत. केवळ गाडीचे कागदपत्रे त्यांच्या नावावर केली नव्हती, असे अमोल नलावडे यांनी म्हटले आहे.दरम्यान अमोल नलावडे म्हणाले की, त्या गाडीशी किंवा त्यात सापडलेल्या पैशाशी माझा कसलाही संबंध नाही. त्या गाडीत कोण-कोण होतं, हेदेखील मला माहीत नाही. कोल्हापूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या सांगोला येथील एका गाडीतून पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर सुमारे 5 कोटी रुपयांची रोख रक्कम असलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ही गाडी अमोल नलावडे यांच्या मालकीची असल्याचे कागदपत्रावरुन दिसून आले. पण आपण ही गाडी जून महिन्यातच विकल्याचा दावा त्यांनी केला आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकेबंदीदरम्यान ही रक्कम ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात आटपाटी तालुक्यात एका ओढ्यात सुमारे 80 लाख रुपयांची रक्कम पोलिसांना सापडली होती.
संबंधित गाडी ही सांगोला येथील एका नलावडे नावाच्या व्यक्तीवर असल्याची माहिती मिळाली आहे. सांगोला या ठिकाणी एका नेत्याची ही रक्कम असल्याचे पोलिसांना समजले असून त्या दृष्टीने खातरजमा करण्यात येत आहे. ही रक्कम नेमकी किती आहे हे समजण्यासाठी याबाबत पोलिसांनी नोटा मोजण्यास सुरुवात केली आहे.
संजय राऊतांचे ट्विट काय?
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय की, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15कोटी सापडले!हे आमदार कोण?,काय झाडी…काय डोंगर….मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75कोटी पाठवले15कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू..किती हे खोके? असा सवाल उपस्थित करत अप्रत्यक्ष शहाजी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
शहाजी पाटील म्हणाले की, संजय राऊतांची सत्ता गेल्यापासून त्यांना झोपताना झाडं आणि उठताना डोंगर दिसत आहेत. सांगोला म्हटल्यानंतर त्यांचा डोळ्यासमोर फक्त माझा चेहरा दिसतो. मला याबद्दल कोणतीही माहिती नाही, याप्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. मी रोकड जप्त झाल्याची बातमी टीव्हीला पाहिली. माझं यात कुठेही नाव आलेलं नाही. या गाडीशी माझा कोणताही संबंध नाही. तर अमोल नलावडे हे शेकापचा कार्यकर्ते आहेत. त्याचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी होते. गेल्या दोन वर्षांपासून तो माझ्यासोबत शिवसेनेचे काम करत आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यात काय हे मला माहिती नाही.

