पुणे : खराडी येथे अमली पदार्थासह पकडलेल्या दोन संशयितांपासून धागा पकडत पोलिसांनी थेट राजस्थानमध्ये धडक कारवाई करीत मेफेड्रॉन (एमडी) तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त केली. या कारवाईत एक किलो ९६० ग्रॅम एमडी, रोख रक्कम, मोबाईल, चारचाकी वाहन आदी मिळून चार कोटी २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सोमवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील इऑन फेज-२ जवळ तीन फेब्रुवारी रोजी पहाटे मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८) आणि हरीश सुजनाराम देवासी (वय २२, रा. वाघोली) या दोघांना २७ ग्रॅम एमडीसह ताब्यात घेण्यात आले होते.
त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात दोघेही आरोपी राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील असून, ते तेथून एमडी मागवून शहरात विक्री करीत असल्याचे समोर आले.
त्यानंतर सात फेब्रुवारी रोजी वाघोली परिसरातून योगेश ऊर्फ मनीष विष्णोई (वय ३०, रा. जोधपूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५१ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. तसेच, त्याचा साथीदार सचिन ऊर्फ एस.के. विष्णोई याला हडपसर-मुंढवा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडील चार लाख ६५ हजारांची रोकड आणि मोबाईल जप्त करण्यात आला.
या आरोपींच्या चौकशीत मांजरी बुद्रूक येथील अमित सुनील घुले (वय ४०) याचा सहभाग उघड झाला. त्याच्याकडून ३९८ ग्रॅम एमडी आणि वाहन असा एक कोटी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, मुख्य सूत्रधार राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाच तपास पथके राजस्थानला रवाना करण्यात आली.
तेथे छापे टाकून मुख्य वितरक रतनलाल किष्णाराम जाट (वय २०) याला अटक केली. त्याच्याकडून दोन कोटी ७६ लाख रुपये किमतीचे एक किलो ३८४ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. तसेच फरार आरोपी रामकरण जाट यालाही ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण कारवाईत एकूण एक किलो ९६० ग्रॅम एमडी, रोख रक्कम, मोबाईल, मोटार आदी मिळून चार कोटी २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खराडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, प्रभारी निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्यासह विविध पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रवींद्र गोडसे करीत आहेत.

