नागपूर-महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत होणारा पराभव स्पष्ट दिसू लागल्याने मतदार याद्यात घोळ केल्याचा आरोप पराभूत मानसिकतेमधून केला जात असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. एरव्ही ईव्हीएमवर बोलणारे मविआचे नेते आता मतदार यादीवर बोलू लागले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते कोराडी (नागपूर)येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये वाद असून केवळ भाजपा आणि महायुतीचा विरोध करण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. मविआचे देशासाठी समर्पण नाही, अजेंडाही नाही. निव्वळ जाती-पातीचे राजकारण करून सामाजिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. दिवसभर राजकारण आणि फेक नॅरेटिव्ह पसरविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एक दिवस असा येईल, की ज्या दिवशी मविआमधील सर्व उमेदवारीसाठी मारपीट करतील. दुसरीकडे भाजपा-महायुती विचारधारेतून आणि महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा घेऊन काम करीत आहे.
- मतदार यांद्यांमध्ये सुधारणा
2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी नावे मोठया संख्येत गहाळ झाल्याचे उघड झाले होते. महाराष्ट्रात अशा मतदारांची संख्या मोठी होती. ही नावे का गायब झाली? कशी गायब झाली? कुणाच्या आदेशाने गायब झाली? या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी भाजपाच्या शिष्टमंडळाने माझ्या नेतृत्वात केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. तेव्हा मविआचे नेते का चुप्प होते? तेव्हा हा प्रश्न का उपस्थित केला नाही?, असाही प्रश्न त्यांनी विचारला. आता कॉंग्रेस घाबरली आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही अधिकाधिक मतदान करा,असे जनतेला आवाहन करणार असल्याचे ते म्हणाले. - नितीन गडकरींचे मार्गदर्शन
देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांनी काही जागांवरती आम्हाला मार्गदर्शन केले असून , गडकरी महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी पूर्णवेळ प्रचार करणार आहेत.
…………………..