पुणे- भाजपची उमेदवार यादी अद्याप अधिकृत रित्या जाहीर झाली नसली तरी यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यादी दाखवून त्याबाबत त्यांचे मत घेतल्यावर काही अत्यल्प जागा वगळता अंतिम यादी तयार असल्याचे वृत्त आहे. आणि या यादीची माहिती बावनकुळे,फडणवीस,चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांना असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांनी याबाबत गुप्तता पाळली आहे. एकूणच सूत्रांनी मिळविलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून चंद्रकांतदादा पाटील यांची कोथरूड मधून तर सिद्धार्थ शिरोळे यांची शिवाजीनगर मधून उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जाते आहे.
कोल्हापूर मधून पुण्यात आल्यावर चंद्रकांत पाटलांनी जरी कोथरूडला आपलेसे केले असले तरी येथील स्थानिक नेत्यांनी या वेळी त्यांच्या विरोधात मोहीम उघडल्याचे दिसले आहे. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उघडपणे मैदानात उतरून चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला आव्हान देत स्वतः लढण्याची तयारी सुरु केली आहे.चंद्रकांत पाटील,दिल्ली स्थित एक पत्रकार,आणि खुद्द भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी बालवडकर यांना समजविण्याचा प्रयत्न केलाय पण त्यात त्यांना यश आल्याचे वृत्त नाही.मात्र कोथरूडमधून महाविकास आघाडीकडे फार भक्कम उमेदवार नसल्याने बालवडकर यांनी जरी बंडखोरी केली तरी चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या मतदारांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही असा भाजपा नेत्यांचा दावा आहे. अलीकडेच मनसे च्या काही स्थानिक नेत्यांनी बालवडकर यांची भेटही घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता बालवडकर नेमकी कोणती भूमिका घेणार यावरही पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून सिद्धार्थ शिरोळे यांनी ५ वर्षे सातत्याने ठेवलेला जनसंपर्क आणि इथल्या समस्या विधीमंडळात विनम्रतेने मांडून सोडविण्याचा केलेला प्रयत्न हेच त्यांच्या यशाचे मूळ कारण असणार आहे. त्यांना पक्षातूनही फारसा विरोध नाही आणि कॉंग्रेस कडे त्यांच्या विरोधात इच्छुक असलेल्यामध्येच मोठी फाटाफूट दिसून आलेली आहे.