राज्यातील विधानसभा निवडणुकांचीउमेदवार यादी घोषित करताना किमान ३०/ ३० उमेदवार ब्राम्हण असतील याची काळजी महायुती आणि मविआ या दोहोंनी घ्यावी अन्यथा ब्राम्हण समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा गर्भित इशारा ब्राम्हण आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांनी द्यायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात २८८ पैकी १० मतदारसंघ ब्राह्मणबहुल आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मिळून किमान ३० ब्राह्मण उमेदवार द्यावेत, अशी मागणी अ.भा. ब्राह्मण महासंघाने मविआ, महायुतीकडे केली आहे. राज्यात ब्राह्मण केवळ साडेतीन टक्के आहेत असे म्हणणे बंद करा आणि सत्तेतील वाटा द्या, असे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गोविंद कुलकर्णी म्हणालेे. महायुती आणि महाविकास आघाडीनेही याकडे दुर्लक्ष करू नये. आम्ही न बोलताही बरेच काही करू शकतो असा इशाराही त्यांनी दिला.महाराष्ट्रात ब्राह्मणांची ८० हजार ते १ लाख २० हजार मतदार संख्या असलेले दहा मतदारसंघ आहेत. कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, चिंचवड, डोंबिवली, विलेपार्ले, दक्षिण पश्चिम, नाशिक आदींचा त्यात समावेश आहे. ३० ते ५० हजार मतदार असणारे ३७ मतदारसंघ आहेत. सर्व राजकीय पक्षांनी ठरवल्यास किमान २७ ते २८ मतदारसंघात ब्राह्मण उमेदवारांना संधी मिळू शकते असे कुलकर्णी म्हणाले.
महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या सुमारे १० टक्के ब्राह्मण आहेत. त्यांची संख्या सुमारे १ कोटी १० लाख आहे. यामध्ये जवळजवळ ६० टक्के देशस्थ आणि २० टक्के चित्पावन ब्राह्मण आहेत. २० टक्के इतर असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात १२% ब्राह्मण आहेत आणि ते प्रमुख मतदार गट आहेत. पण, महाराष्ट्रात ब्राह्मण एकजूट होत नाही अशी खंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली. आपण केवळ महाराष्ट्रीय ब्राह्मणांना एकत्र धरतो. पण, महाराष्ट्रात मोठ्या संख्येने पंजाबी, दाक्षिणात्य, उत्तर प्रदेेशी, राजस्थानी, गौड सारस्वत आणि इतर शाखीय ब्राह्मण राहातात. या सर्वांनी एकत्र येऊन ताकद दाखवली तर राजकीय पक्षांना ब्राह्मणांचा विचार उमेदवारी देताना करावाच लागेल. पण दुर्दैवाने दिशा एक नसल्याने ब्राह्मण मागे फेकले जातात असे कुलकर्णी यांनी सांगितले. देशात १९३१ सालच्या जातनिहाय जनगणनेनंतर पुन्हा तशी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात नेमके कोणत्या जातीचे किती लोक राहतात याची ठोस आकडेवारी नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते ढोबळमानाने महाराष्ट्रातील ब्राह्मणांची लोकसंख्या ५.५ टक्के नाेंदवली होती. त्यालाही आता ९३ वर्षे होऊन गेली. बिहारने केलेल्या जात गणनेनुसार तिथे ब्राह्मण ३.६५ टक्के आहे असे कुलकर्णी म्हणाले.
पुण्यातील कसबा मतदारसंघातून ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी मागणी करणारे पत्र ब्राह्मण संघटनेने प्रसिद्ध केले आहे. भाजप आणि शिंदेसेना हिंदुत्ववादाचा प्रचार करीत असल्यामुळे त्यांनी राज्यभरात किमान ३० ब्राह्मण उमेदवार उभे करावेत, असे या पत्रात म्हटले आहे. तसेच कसबा मतदारसंघ हा ब्राह्मणबहुल असल्याने या ठिकाणी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी भालचंद्र कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.