पुणे- मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन आणि आता निवडणुकीतही जरांगे पाटलांची चळवळ सुरु असताना भाजपमधील माजी खासदार संजय काकडे,तसेच राष्ट्रवादी अजितदादा गटाचे दीपक मानकर आणि रुपाली पाटील अशा रथी महारथींची नाराजी महायुतीतील भाजपा आणि अजितदादा गटाने ओढवून घेतल्याने पुण्यातील निवडणुकीत महायुतींच्या उमेदवारांना फटका बसू शकतो असा अंदाज राजकीय समीक्षकांनी वर्तविला आहे.
भाजपा सहयोगी राज्यसभा सदस्य अशीच गणना असतानाही माजी खासदार संजय काकडे यांनी गेल्या १० वर्षात अगदी नोटबंदी पासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापर्यंत आणि महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक वेळी भाजप मध्ये हिरारीने उभे राहून पक्षासाठी झोकून काम केले.पण प्रत्यक्षात त्यांच्या वाट्याला अवहेलनाच आली असा त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून दावा केला जातोय आता अजितदादा देखील रुपाली चाकणकर यांची तत्परतेने फेर निवड झाल्याने नाराजीचे बळी ठरत आहेत. दीपक मानकर यांनी अजितदादा गटाचे शहर अध्यक्ष पद घेऊन शरद पवार गटाशी वाईट पणा स्वीकारत अजितदादांचा गट सक्षम करण्यासाठी जोरदार मेहनत घेतली. मनसेची वाघीण अशी प्रतिमा असलेल्या रुपाली पाटील अजितदादा गटात येऊन अनेक वर्षे झाली पण त्यांच्या ही पदरी निराशाच पडल्याचा समीक्षकांचा दावा आहे. एकीकडे भाजपा च्या विद्यमान आमदारांच्या बद्दल असलेली नाराजी त्यात संजय काकडे यांना कायमच २ हात दूर ठेवणारी राजनीती आता निवडणुकीत मतदारांच्या करवी आपले रंग निश्चित दाखवेल असे म्हटले जाते आहे. भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे कायम काकडे यांचे समर्थक राहिले आहेत पण त्यांनी देखील आयत्या वेळी सोयीस्कर भूमिका घेतल्याची टीका होते आहे. एकूणच मराठा आणि बहुजन समाजाची भाजपा आणि आता अजितदादा गटाच्या बाबतीतली नाराजी देखील वाढत चालल्याचे चित्र आहे.या सर्वांचा निवडणुकीवर काय परिणाम होईल हे आता मतदानापूर्वीच दिसणार आहे हे निश्चित .