मुंबई-मराठी अभिनेते अतुल परचुरेयांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं.तेव्हा त्यांचं वजन झपाट्याने कमी झालं होतं. त्यांची स्थिती कोणालाच पाहवत नव्हती. तरी त्यांनी हिमतीने कॅन्सरवर मात केली आणि ते ठणठणीत बरे झाले. तब्येत सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा कामालाही सुरुवात केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.
कॅन्सरवर मात करुनही गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. त्यांना काही कॉम्प्लिकेशनला सामोरं जाव लागत होतं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकतीच त्यांनी ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाची घोषणाही केली होती. जोमाने काम सुरु केलं होतं. मात्र तब्येतीने त्यांची साथ दिली नाही. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. एक हरहुन्नरी अभिनेता आपल्यातून हरपला आहे.

