श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग सार्वजनिक नवरात्र उत्सव ; महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्येविषयी जनजागृती
पुणे : महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, बालशोषण, नशाखोरी, वृद्धांची उपेक्षा, बेरोजगारी, भेदभाव यांसह विविध दहा सामाजिक समस्यांच्या प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरासमोर करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीराम यांची वानरसेना आणि रावणाची सेना यांच्या युद्धाचा जीवंत प्रसंग देखील सादर करण्यात आला.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल २५ फूट उंच प्रतिकात्मक रावणाचे दहन यावेळी करण्यात आले. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड यांसह आमदार माधुरी मिसाळ देखील यावेळी उपस्थित होत्या.
डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्यासोबतच नारी शक्तीचा सन्मान देखील करण्यात आला. यंदा आयोजित केलेल्या रावण दहन कार्यक्रमात देखील महिला अत्याचार व स्त्री भ्रूण हत्येसारख्या समस्यांच्या प्रतिकात्मक रावणाचे दहन करुन समाजात स्त्री सबलीकरणाचा संदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.