मुंबई-अक्षय शिंदे याची बाजू कोणीही घेत नाही. त्याचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. तर ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, ते मागे घ्यावे, अशी आमची मागणी आहे. झटपट न्याय करा, हीच आंदोलकांची मागणी होती. आता तेच करण्यात आले आहे. शिंदे आणि फडणवीस खोटे बालून जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, स्वच्छतागृहात काम करणाऱ्याला बंदूक चालवता येते का, पोलिसांच्या कमरेला असलेली बंदूक लॉक असते.ती हिसकावून लॉक काढून आरोपीने गोळीबार केला, हे कोणालाही पटण्यासारखे नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि पोलिसांना आपटे, कोतवाल यांना वाचवायचे आहे. त्यांना वाचवण्यासाठी मुख्य पुरावा नष्ट करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, अक्षय शिंदेने आत्महत्या केल्याचे आधी सांगण्यात आले. हात बांधलेला आरोपी पोलिसांच्या कमरेची बंदूक हिसकावून आत्महत्या करतो काय?. त्यानंतर काही वेळातच सांगितले की त्याने गोळीबार केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ एन्काऊंटर केले. त्यामुळे आधी काय खोटे बोलायचे, ते ठरवून खोटे बोला, असा टोलाही त्यांनी लगावला. ते दररोज खोटे बोलत आहे. मात्र, या प्रकरणी काय खोटे बोलायचे, ते कॅबिनेटमध्ये ठरवा आणि त्यानंतर बोला.
संजय राऊत म्हणाले की, आरोपीचे एन्काउंटर करत जनतेची मागणी न्याय्य होती, हेच सिद्ध झाले आहे. याप्रकरणी न्यायालयात खटला चालवला गेला नाही. संशयास्पद पद्धतीने हे एन्काउंटर झाले आहे. त्यामुळे आता आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायला हवे. बदलापूरमधील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करत पास्को कायद्यातंर्गत गुन्हे दाखल असलेल्यांना अद्याप अटक का झाली नाही, असा सवालही त्यांनी केला. आता अक्षय शिंदेची हत्या केल्यानंतर किंवा एन्काऊंटर केल्यानंतर या सर्व आरोपींना हजर केले जाईल. हे खूप मोठे षडयंत्र आहे. कोणालातरी वाचवायचे आहे, हे यातून स्पष्ट दिसून येत आहे. तसेच ज्यांना वाचवायचे आहे, त्यांच्यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा वरदहस्त आहे.
अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होते तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? असा प्रश्न राऊतांनी शिंदे- फडणवीस-पवार सरकारला विचारला आहे. “कुणाला वाचविण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.