पुणे -पुण्यातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उद्योजकाचा पाच जणांच्या टोळक्याने घरात शिरून धारदार शस्त्राने वार करत खून केला. कर्नाटकातील कारवार तालुक्यातील हणकोणमध्ये टोळक्याने घरात शिरून हा हल्ला केला. विनायक काशीनाथ नाईक (५२) असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. या घटनेत त्यांची पत्नी वृषाली या गंभीर जखमी झाल्या आहेत.
दरम्यान, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सदाशिवगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक नाईक हे पुण्यातील मोठे उद्योजक असून त्यांचा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा मोठा व्यवसाय आहे. ते कारवार तालुक्यातील हणकोण या मूळ गावी सातेरी देवीच्या उत्सवानिमित्त गेले होते. हा उत्सव १० ते १६ सप्टेंबरदरम्यान होता. त्यानंतर आईचे श्राद्ध करायचे असल्याने नाईक कुटुंबासह तिथेच थांबले होते. रविवारी (दि. २२) ते पुण्यात जाण्यासाठी निघणार होते. त्यामुळे ते लवकरच उठले होते. पहाटेच्या सुमारास मोटारीतून आलेल्या पाच जणांनी विनायक नाईक यांच्यावर चाकू, लोखंडी रॉड, तलवारीने निर्घृण हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी त्यांची पत्नी वृषाली यांनी हल्लेखोरांचा प्रतिकार केला तेव्हा त्यांनी वृषाली यांच्यावरही वार केले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच कारवार पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.