बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती. परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही, यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
युपी-बिहारची एन्काऊंटर संस्कृती महाराष्ट्रात- जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले- शाळेतील सीसीटीव्ही गायब झाले. पोलिस स्टेशनलाही उशीराने तक्रार नोंदवण्यात आली. पालकांना तेरा-तेरा तास बसवून ठेवण्यात आली. आणि आता त्यात अनेक बाबी समोर येत आहेत. असा गुन्हा लपविणे हादेखील एक गुन्हा आहे. त्या आरोपीला फाशीच द्यायची होती. परंतु हा न्याय न्यायालयाद्वारे मिळायला हवा होता.
या प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात नाही ना? संस्थाचालक कुणाशी संबंधित आहेत. अक्षयला मारण्यासाठी जी काही युक्ती लढविली ती संशयास्पद असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
शाळेचे संस्थाचालक भाजपचे, त्यांना वाचविण्यासाठी एन्काऊंटर- अनिल देशमुख
आरोपी हवालदाराची बंदूक घेऊन स्वतःवर गोळीबार करू शकत नाही. आदर्श शाळेचे संस्थाचालक हे भाजपशी संबंधित कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे अनिल देशमुख म्हणालेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.