विद्यार्थ्यांनी आपल्या कामाविषयी आवड, वचनबद्धता, उत्कृष्टता, व्यापक दृष्टीकोन आदी तत्वे अंगी बाळगावीत- राज्यपाल
पुणे, दि. २४: पदवीनंतर व्यावसायिक प्रवासाला सुरुवात करताना विद्यार्थ्यांनी आपल्या कामाविषयी प्रचंड आवड, वचनबद्धता, उत्कृष्टता, व्यापक दृष्टीकोन, कुतूहल तसेच सचोटी आदी तत्वे अंगी बाळगावीत, असे मार्गदर्शन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना केले.
लोणी काळभोर येथील एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ७ व्या पदवीप्रदान सोहळ्यात श्री. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे संस्थापक व अध्यक्ष विश्वनाथ कराड, इस्त्रोच्या बेंगळुरू स्थित यु. आर. राव उपग्रह केंद्राचे संचालक एम. शंकरन, एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. मंगेश कराड, एमआयटी संस्था समुहाचे कार्यकारी विश्वस्त राहुल कराड आदी उपस्थित होते.
हे जग खूप मोठे असून विद्यार्थ्यांनी सर्वत्र संधी शोधल्या पाहिजेत, असा कानमंत्र देऊन राज्यपाल म्हणाले, जे सक्रियपणे सतत काम करत राहतात त्यांच्यासाठी यश नेहमीच उपलब्ध असते. त्यामुळे कधीही निराश होता कामा नये. जे अविरतपणे शारीरिक आणि मानसिक कष्ट करत राहतात त्यांना यश निश्चित मिळते. तुम्ही इतरांशी स्वतःची तुलना न करता ते कसे आणि कशामुळे यशस्वी झाले, कसे काम करतात, आपल्या कल्पनांना कामाशी कशा प्रकारे जोडतात, या बाबींचे निरीक्षण केल्यास तुम्ही निश्चितच यशाकडे वाटचाल करू शकाल, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी यश मिळविण्यासाठी सोपा मार्ग (शॉर्टकट) निवडता कामा नये. तुम्ही तुमचा योग्य मार्ग निवडला पाहिजे आणि मूल्यांच्या सहाय्याने वाटचाल करावी. 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवताना विद्यार्थ्यांचे योगदान आपले पालक, शिक्षक आणि भारताला अभिमान वाटेल असे राहील; तसेच आपण देशाला केवळ बलवानच नव्हे तर भारताला जगाची सेवा करण्यासाठी सक्षम कराल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोविड काळात आपण जगाप्रती दयाभाव बाळगला. आपण तयार केलेली लस आपल्या सर्व भारतीयांना मोफत उपलब्ध करुन दिली. केवळ आपल्याच देशासाठी नव्हे तर अन्य गरीब देशांना मोफत उपलब्ध करुन देत मदतीचा हात पुढे केला, ही आपल्या देशाची महानता आहे, असेही श्री. राधाकृष्णन म्हणाले.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञानाकडे संपूर्ण जग आकर्षित झाले आहे. आर्थिक समृद्धीपेक्षा आपले जीवन शांतीमय, सुखमय आहे का आणि जगाची सेवा करता का याला महत्त्व आहे. विज्ञान आणि धर्म यांची युती मानवी जीवनात सौहार्द आणण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास स्वामी विवेकानंद यांनी व्यक्त केला होता. स्वाभिमान, नम्रता, लीनता यांनाच भारतीय संस्कृती म्हटले जाते, ज्यामुळे संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे, या बाबी विद्यार्थ्यांनी अंगी बाळगाव्यात, असेही ते म्हणाले.
एम. शंकरन म्हणाले, शिक्षण म्हणजे वर्षाच्या शेवटी देण्याची परीक्षा नव्हे तर जीवनभर शिकत राहणे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अचानक, पूर्व कल्पना नसताना कसोटी, परीक्षा, समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्ही शैक्षणिक संस्थांमध्ये अभ्यासक्रमाशिवायचे जे अन्य शिक्षण घेता ते देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नकार आणि अपयश आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून त्याला घाबरू नये, असेही ते म्हणाले.
डॉ. मंगेश कराड म्हणाले, एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाकडून आज २ हजार ९७२ विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली आहे. यात २२ पी.एच.डी., ५३ सुवर्ण पदके, १९४ उच्च क्रमवारी धारक (रँक होल्डर्स) यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला विद्यापीठाचे कार्यकारी संचालक विनायक घैसास, प्र- कुलगुरू अनंत चक्रदेव, निबंधक महेश चोपडे, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, संचालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
0000