पुरुषसत्तेची पाळंमुळं समजून घेताना… कार्यशाळेतील सूर
पुणे (प्रतिनिधी): स्त्री विरोधी पुरुष नाही तर पुरुषसत्ता पुरुषांना माणूसपणापासून दूर नेते, हे लक्षात घेतलं तर पुरुषसत्तेची पाळंमुळं उखडून टाकणं अजिबात अवघड नाही. पुरुषसत्ता स्त्री पुरुष दोघांना साचेबद्ध राहण्याचे धडे देते, अशक्य नाही मात्र अवघड असले तरी त्यासाठी प्रयत्न करत राहूयात. ही वक्तव्ये आहेत पुरुषसत्तेची पाळंमुळं समजून घेताना… या कार्यशाळेतील. अभिव्यक्ती आयोजित २२ सप्टेंबर रोजी लोकायत हॉलमध्ये ही कार्यशाळा पार पडली. अभिव्यक्तीच्या समन्वयक अलका जोशी आणि कार्यकर्ते रुषल हीना यांनी उपस्थितांना बोलतं करत फिल्म, खेळ यांच्या माध्यमातून या विषयाची मांडणी केली. स्त्री पुरुष दोन्हीही खरंतर समाजातील महत्त्वाचे घटक आहे, पुढची पिढी जन्माला यावी म्हणून निसर्गाने केवळ लैंगिक अवयवांचे भेद केले मात्र समाजाने त्यांच्यात भेदभाव करत पुरुषाला श्रेष्ठ आणि स्त्रीला दुय्यम स्थानी ठेवले. यातून जन्माला आला मालकी हक्क-सत्ता. आणि ते शाबूत ठेवण्यासाठी त्यातून आली हिंसा. श्रेष्ठ कनिष्ठ अबाधित राहावे यासाठी चौकटी आखून दिल्या. यातून स्त्रियांचं दबलेलं तर पुरुषांचं कठोर असंवेदनशील व्यक्तिमत्त्व घडत जातं. मात्र विचारपूर्वक-प्रयत्नपूर्वक याला आव्हानं देऊ शकतो. आज समाजात अनेक पुरुष आणि स्त्रिया, कुटुंबे सामानतेत रहात जगत आहेत. इतिहासातली उदाहरण सांगायची झाली तर महात्मा फुले, पेरियार,म. गांधीजी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे पुरुष ज्यांनी स्त्रियांना बरोबरीचं स्थान देण्यासाठी अथक प्रयत्न केले. आपण ही पाळंमुळं समजून घेतली तर स्त्री विरुद्ध पुरुष नाही तर स्त्री आणि पुरुष असा समानतेवर आधारित समाज निर्माण करणं सध्या होईल. कार्यशाळेला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अगदी कोल्हापूरहून कार्यशाळेसाठी तरुण तरुणी आले होते.