मुंबई, दि. २१ सप्टेंबर
भाजपा महायुतीचे सरकार राज्यात भ्रष्ट मार्गाने आले आणि मागील दोन अडीच वर्षात महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेतेच दादागिरी करत आहेत, खुलेआम धमक्या दिल्या जात आहेत. धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे.राज्यातील परिस्थिती गंभीर असताना राज्य सरकार कारवाई करताना दिसत नाही.राज्यात गृहमंत्री आहेत का,असा प्रश्न पडावा एवढी गंभीर परिस्थिती झाली आहे, असे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी सांगितले आहे.
काँग्रेस शिष्टमंडळाने राजभवनवर जाऊन महामहिम राज्यपाल यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, चरणजित सप्रा आदी उपस्थित होते.
प्रसार माध्यमांशी बोलताना नसीन खान म्हणाले की, आज आम्ही राज्यपाल महोदयांना भेटून निवेदन दिले आहे. राज्यातील कायदा व युव्यवस्था बिघडलेली आहे. गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत. २५-३० FIR झाले तरी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. सत्ताधारी पक्षाचे काही आमदार, खासदारच पोलीसांना उघड उघड धमकी देत आहेत. अशा परिस्थितीत पोलीस तरी कशी कारवाई करणार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांनाही भाजपाचे खासदार अनिल बोंडे व शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी धमक्या दिल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवला, आंदोलने केली, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली परंतु हे महाभ्रष्ट भाजपा सरकार कारवाई करत नाही. यावेळी महामहिम राज्यपाल यांनी सरकारला योग्य ते निर्देश देऊ, असे आश्वासन दिले आहे असे नसीम खान म्हणाले.