थकबाकीमुक्तीच्या संधीला उरले आता ७० दिवस
पुणे, दि. २१ सप्टेंबर २०२४: कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीची रक्कम एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. संपूर्ण व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ होणाऱ्या या योजनेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ५ हजार ५३८ ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यातील तब्बल ५ हजार ३१२ वीजग्राहकांनी आणखी सूट घेऊन थकबाकी एकरकमी भरण्यास पसंती दिली आहे.
वीजबिलांच्या थकबाकीमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना ९१ दिवसांसाठी म्हणजे दि. १ सप्टेंबर ते दि. ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. आता या योजनेच्या कालावधीला ७० दिवस शिल्लक आहेत. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे. किंवा मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील ६ लाख २९ हजार ८३ अकृषक ग्राहकांकडे सद्यस्थितीत ९०१ कोटी ९७ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील मूळ थकबाकीपोटी ७६२ कोटी १९ लाख रुपयांचा भरणा केल्यास संपूर्ण व्याज व विलंब आकाराचे १०० टक्के म्हणजे १३९ कोटी ७८ लाख रुपये माफ होणार आहेत. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या या सर्व ग्राहकांनी अभय योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त् व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत ५ हजार ५३८ वीजग्राहकांनी थकबाकीमुक्तीसाठी या योजनेत सहभाग घेतला आहे. या ग्राहकांकडे एकूण ११ कोटी ५५ लाख रुपयांची एकूण थकबाकी असून त्यातील मूळ थकबाकीच्या १० कोटी ६ लाखांचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची संपूर्ण १ कोटी ५० लाख रुपये माफ होणार आहे. विशेष म्हणजे यातील ५ हजार ३१२ ग्राहकांनी मूळ थकबाकीचे ९ कोटींची रक्कम एकरकमी भरण्यास पसंती दिली आहे. त्यापैकी ४ हजार ६२ ग्राहकांनी ४ कोटी ५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. पुणे जिल्ह्यात २७८८, सातारा- २५१, सोलापूर- ८७९, कोल्हापूर- ३२१ आणि सांगली जिल्ह्यातील १२९९ थकबाकीदारांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.
वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदार यांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल असा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे जागा वापरात असो किंवा नसो, वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त होण्याची संधी महावितरणकडून देण्यात आली आहे. तसेच वीजग्राहकांना मागणीनुसार नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे. महावितरणच्या फ्रेंचायझी क्षेत्रातील ग्राहक देखील या योजनेत सहभागी होऊ शकतात.
या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे योजनेत सहभागी होण्याची व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.