मुंबई, दि. २१ सप्टेंबर
काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उल्हानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सीमा महेश आहुजा यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस परिवारात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
“भारतीय जनता पक्ष कोणाचाच नाही, सर्वात खोटे बोलणारा पक्ष भाजपा आहे. ‘वन नेशन, वन टॅक्स’, इन्स्पेक्टर राज संपवणार, परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार अशी भरमसाठ आश्वासने नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली दिली व जनतेने मोदींवर विश्वास टाकून त्यांना सत्ता दिली, पण सत्तेवर येताच मोदींनी या आश्वासनाकडे दुर्लक्ष केले. पहिल्याच दिवशी संसदेला नमन केले व ती संसदच बदलून टाकली, नवे संसद भवन बनवले पण त्यालाही गळती लागली. देशाचा पंतप्रधान खोटे बोलतो हे आधी कधी पाहिले नाही. भाषणात नरेंद्र मोदी महिलांची सुरक्षा करण्याचे सांगतात पण भाजपाच्या राज्यातच महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. जनतेचा आता भाजपावरचा विश्वास उडाला आहे. काँग्रेस पक्षच सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे”, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
या कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, आमदार राजेश राठोड, उल्हासनगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे, प्रवक्ते मदन जाधव, शंकर आहुजा आदी उपस्थित होते.