संभाजीनगर दिनांक २० सप्टेंबर
युवान वालिया (मुंबई महानगर जिल्हा) व आद्या बाहेती (परभणी) यांनी अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडविला आणि तिसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे अकरा वर्षाखालील मुले व मुली गटात विजेतेपदावर मोहोर नोंदविली.
टेबल टेनिस स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन ऑफ संभाजीनगर यांनी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात संभाजीनगर जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मुलांच्या अंतिम फेरीत युवान (मुंबई महानगर जिल्हा) याने आलम सिद्दिकी (बीड) याची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित केली. त्याने हा सामना ११-३, ८-११,११-५,११-५ असा जिंकताना काउंटर अटॅक पद्धतीचा बहारदार खेळ केला. या सामन्यातील दुसरी गेम घेत सिद्दिकी याने उत्सुकता वाढवली होती मात्र नंतरच्या दोन्ही गेम्स मध्ये युवान याने आपल्या खेळावर नियंत्रण राखले आणि विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात आद्या हिने अजिंक्यपद पटकावित अव्वल मानांकन सार्थ ठरविले. मात्र अंतिम सामन्यात तिला जिनया वधान या ठाण्याच्या द्वितीय मानांकित खेळाडू विरुद्ध संघर्ष करावा लागला हा सामना तिने २-११,१२-१०,११-९,९-११,११-५ असा जिंकला.
मुलांच्या तेरा वर्षाखालील गटात टी एस टी मुंबई संघाच्या झैन शेख याने विजेतेपद मिळवित अग्रमानांकन सार्थ ठरविले. त्याला अंतिम सामन्यात त्याचाच सहकारी व द्वितीय मानांकित खेळाडू आरव व्होरा याने चुरशीची लढत दिली. हा सामना शेख याने १०-१२,११-७,६-११,१३-११,११-५ असा घेताना चॉप्स पद्धतीचा बहारदार खेळ केला. मुलींच्या गटात अग्रमानांकित मायरा सांगळेकर या टीएसटी मुंबईच्या खेळाडूने सहज विजेतेपद पटकाविले. तिने अंतिम सामन्यात ठाण्याची खेळाडू धनश्री तरडे हिच्यावर ११-५,११-९,११-७ अशी मात करताना परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला.