पुणे, दि. १९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET 2024) साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना http://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वरील वेबसाईटवर देण्यात आला आहे, असेही श्री. राठोड यांनी कळविले आहे.
0000